शेतावरच्या शेकोटीभोवती
पाच-दहा भुते जमली
टाईमपाससाठी एकमेकांना
माणसाच्या गोष्टी सांगू लागली
काय सांगावेत माणसाच्या
हावरटपणाचे एकेक किस्से
कुणी निर्लज्ज मागतो लाच
कुणाला हवेत इस्टेटीत हिस्से
कुणाला हवा झटपट पैसा
कुणाला सत्तेची मोठी खुर्ची
ह्यांची भूक भागवण्यासाठी
घालतात दुसऱ्यांचे प्राण खर्ची
स्वतःच्या वासनेच्या पिकांना
दुसऱ्याच्या प्राणांची खते
एकवेळ परवडलो आपण
नकोत ही जिवंत भुते
शेतावरच्या शेकोटीभोवती
पाच-दहा भुते जमली
लागताच चाहूल माणसाची
जागेवरच अदृश्य झाली