ते कुणाचे शब्द होते? ते कुणाचे सूर होते?
अंतरी वस्तीस होते, अन् तरीही दूर होते
हे कसे वात्सल्य ज्याचा कोरडा असतो उमाळा?
राहिले पान्हावण्याचे ते अभागी ऊर होते
मी प्रवाहाच्या बरोबर वाहण्याचे काम केले
पैलतीरी पोचण्याइतके कुठे मगदूर होते?
लक्ष योनींचा पसारा, ह्या फुकाच्या येरझारा
जन्म-मरणाचीच चिंता, मोक्ष मिळणे दूर होते
'भृंग', नाभीकमळ शोधू , ती मिठी असते चिरंतन
बाप, आई, मित्र, पत्नी; सर्व क्षणभंगूर होते...