काव्य असेच बनत नाही

काव्य असेच बनत नाही, ते नीट रचावे लागते
हृदयाच्या कणाकणात प्रेम असावे लागते

काव्य असेच बनत नाही, ते मूर्त व्हावे लागत
नयनातल्या प्रतिमेचे वर्णन उत्स्फूर्त यावे लागते

काव्य असेच बनत नाही, त्याला उंची असावी लागते
शब्दाशब्दाला अर्थाची कुंची असावी लागते

काव्य असेच बनत नाही, त्यात भाव असावा लागतो
प्रत्येक ओळीत हृदयाचा घाव असावा लागतो

काव्य असेच बनत नाही, त्यात बोध असावा लागतो
अंधारातून उजेडाचा शोध असावा लागतो

काव्य असेच बनत नाही, त्याची आवड असावी लागते
त्यालाही मग श्रोत्यांची निवड बनावी लागते