कसाबसा मी जगतो ते

मी जाणुन आहे वास्तव की प्राजक्त पहाटे असतो ते
मी जागा नसतो पाहुन मग तो उमलुन उमलुन फुलतो ते

हे नकोनकोसे होणे तू अनुभवलेले आहेस कुठे?
मी समजुन वाग स्वतःशी मग समजेल तुला मी म्हणतो ते

ग्रीष्मावरती हेमंतछटा  देणे पदराला जमले पण
शरदाचे डोळे दाखवती वर्षाही येथ बरसतो ते

आकाश तुझे, हा चंद्र तुझा, दुनियाच तुझी झाली आहे
पण आठवतो कोठे जो सारे तुझ्यावरी उधळवतो ते

तू असताना नसलीस तरी पण नसताना असतेस इथे
ऐकून तरी घे कसे तुझे  मी नसणे 'असणे' करतो ते

हे केस मुलायम ओलेते नाहून चमकणे आवडते
पण पाठ आमच्याकडे तुझी, कळणार कसे जळफळतो ते

निवडुंग कुठे, निशिगंध कुठे, हा मुद्दा अमान्य नाही पण
प्रतिकूल अवस्थेमध्येही बघ वाळवंट हिरवळतो ते

इतकेच तुला कळले की मग सार्थक जन्माचे समजावे
या कणाकणाने मरण्यावरती कसाबसा मी जगतो ते