नागपुरी तडका : बिपाशाले लुगडं

नागपुरी तडका : बिपाशाले लुगडं

शाम्यानं इचीबैन, कहरच केला

बिपाशासाठी मुंबैले, लुगडं घेवुन गेला....

त्याले वाटलं मायबाप, भलते गरिब असन,

म्हुन तिले आंगभर, कपडे भेटत नसन,

वाढलीहूढली पोरगी, तरणीबांड दिसते,

इकडं झाकाले गेली, तं तिकडं उघडं पडते,

म्हुन त्यानं कपड्याचा, थैला भरुन नेला....

जुहुच्या चौपाटीवर, भेट त्यायची झाली,

तिले पाहुन शाम्याची, बंदी विकेट गेली,

तिले म्हणे चोळी घाल,घे लुगडं नेसुन,

थे म्हणे आवमाय, हे भुत आलं कुठुन ?

मंग जुहूवर धमासान, तमाशा सुरु झाला...

लय वळवलं तिचं मन, पण मन नाय वळे,

मंग शाम्या धावे मांगं, आनं थे पुढं पळे,

वन्समोअर,वन्समोअर, लोकं भाय बोंबले,

कॅमेरेवाले पोझ घेवुन,कॅमेरे रोखुन थांबले,

पोलीसायनं बैनमाय,नावकुल विचका केला,

आनं त्याच्यापुढचा एपीसोड, राहुनच गेला.....

                                         गंगाधर मुटे

.........................................

ढोबळ मानाने शब्दार्थ :-

इचीबैन, बैनमाय = च्यायला सारखे.

वाढलीहूढली = वयात आलेली.बंदी = पुर्ण,संपुर्ण.

आवमाय = अग्गबाई मांगं = मागे नावकुल = पुर्णपणे.

.........................................