... रक्तातील हाहाकार!

.................................................
... रक्तातील हाहाकार !

.................................................

देह स्पर्शाकार झाले; स्पर्श देहाकार...!
हा असोशीचा असोशीलाच साक्षात्कार...!
 
खेळ धसमुसळा; तरी सुकुमार अन् हळुवार...
द्यायची अन् घ्यायची घाई किती अनिवार...
कोण नक्की गाजवी कोणावरी अधिकार?
 
हे फुलांपेक्षा मृदू स्पर्शांतले अंगार
मंद अंधारात चाले मोकळा शृंगार
...आणि हुंकारात गुंतू लागले हुंकार...!
 
प्रेम-रागाचा कसा हा वेगळा अवतार... ?
छेडली गेली मुकी एकेक जेव्हा तार...
- नादले झंकार... झंकारातुनी झंकार!
 
मांडुनी एकाच रात्रीचा खुळा संसार
दोन आसुसल्या जिवांचा शांतला अभिसार
पावला विश्राम रक्तातील हाहाकार!

- प्रदीप कुलकर्णी

.................................................
रचनाकाल ः ११ नोव्हेंबर २००९
.................................................