सुगंधाने रातराणीच्या, पहाटे सुर्यास जाग आली
धुंद वातावरण, अन महकत्या पावलाने ती निघून गेली
रातराणीने होई बेबंद, गरागरा फिरे सुर्य स्वच्छंद
प्राजक्ताच्या रांगोळीजवळी, पावलेच त्याची थबकली
सूर्याच्या वाटेवर तगरीने, चांदणेच ओतले घागरीने
चाफ्याचा ताफाच मुजऱ्याला, अस्वस्थ तो सुगंधाने
गुलाब, शेवंतीचा पहारा, ठाव न सांगे गोंडस मोगरा
विचारे पत्ता एकेक फुलाला, ऊसंत ना घेई बिचारा
तो जाई, अन जुई खिन्न होई, वेधण्या लक्ष कमळाची घाई
लाजली जास्वंद, अन सदाफुली, शब्दही ना बोले अबोली
कानोसा गोकर्णाने घेतला, सोनटक्काही टवटवित झाला
गुलमोहराआडून कण्हेर डोकावली, भुरळ पडली लिलीला
बघून त्याची वेडी धावपळ, मान फिरवे सुर्यफुल
उमलले अप्रतिम ब्रह्मकमळ, गंधपावसाची सुरेल दरवळ
युगानुयुगे फिरतो बिचारा,
रातराणी देते गुंगारा,
दुपारी रागावतो, तप्त होतो,
संध्याकाळी नाद सोडतो,
पहाटेच्या घमघम गंधात...
रातराणीस शोधत राहतो.