माझ्या कविता माझ्यासमोर बसून गात रहा!
अर्ध्यामुर्ध्या ओळी लिहून
पाने फाडत राहीन
एक गाणे लावून ठेवून
नुस्ता बसून राहीन
तेव्हा फक्त सारं काही नीट आहे का पहा
माझ्या कविता माझ्यासमोर बसून गात रहा!
खिन्न होऊन खर्जामध्ये
जाऊन लपून बसेन
किंवा मग त्रागा करत
तारेमध्ये चिडेन
तेव्हा म्हण, "अंक मोज, एक ते दहा!"
माझ्या कविता माझ्यासमोर बसून गात रहा!
जेव्हा म्हणेन "बोलू चल..."
तेव्हा मजला सांग
"शब्दांना या गवसत नाही
मनाचा या थांग...
काही नको बोलू असा कुशीत पडून रहा!
माझ्याजवळ बसून तुझ्या कविता ऐकत रहा!!"