एक कप च्या...

           इंग्रज आपला देश सोडून गेले पण त्यांच्या काही सवयी भारतीयांना लावून गेले, त्यातलीच एक सवय म्हणजे चहा. ज्याचा कडवटपणा भारतीयांनी गोड मानला... आणि आज चहा आपल्या जीवनातला महत्त्वाचा भाग बनला आहे. मग त्यासाठी खोललेल्या अमृततुल्यांनी, टपऱ्यांनी चहाला आणखीनच (सार्वजनिक) महत्त्व प्राप्त करून दिले.

            मला आठवतात ते दिवस व तो प्रसंग जेव्हा चहाची आम्ही मित्र अगदी आतुरतेने वाट पाहत असू.. त्या वेळेस मी एका खाजगी दुकानात काम करत असे, मी शिकत असल्या कारणाने मला रात्रपाळी करावी लागत असे असे व मी सकाळी ५ वाजता सुटत असे, माझ्या बरोबर माझे ४ मित्र होते. काम संपल्या वर आम्ही सर्व चहा प्यायला जात असू मग तेथे होणारे जोक असो किंवा साहेबाची नक्कल असू काही क्षणातच रात्रीचा सर्व ताण सहज निघून जाई. शक्यतो येवढ्या सकाळी आम्हीच पहिले गिऱ्हाईक असल्या कारणाने बऱ्याचदा आम्हाला ३० ते ४० मिनिटे दुकान मालकाची पुजा तसेच इतर गोष्टी होई पर्यंत तिथेच वाट पाहावी लागत असे. त्याचे काही वेगळे वाटत नसे कारण गेले अनेक दिवस आम्ही हेच पाहत होतो. त्यातच मला एक गोष्ट नेहमी खटकायची ती म्हणजे पूजेचा भाग म्हणून हा माणूस एक तांब्या भर चहा रस्त्यावर फेकून देई, मला या गोष्टीचे नवल वाटे मी त्याला या बाबत विचारायचा प्रयत्ना पण केला त्यावर " आपले २० रुपये झाले.. (ते द्या आणि निघा)" या भावात त्याने मला मार्गस्थ केले..

           त्याच्या या खडूस स्वभावाला सगळेच चांगल्या परिचयाचे होते त्या मुळे हे काही नवीन नव्हते आम्ही कितीही दररोज येत असलो तरी "बोला काय काम आहे.... " हा प्रश्न तो अगदी त्रासलेल्या भावाने आम्हाला न चुकता विचारे.. नंतर मला तेथे काम करणाऱ्या अण्णाकडून त्या फेकलेल्या चहा बद्दल कळले  की तो हे देवाला पहिल्या चहाचा नैवेद्य म्हणून करतो... त्याच्या या विचित्र स्वभावाला शक्यतो कोणी वाट्याला जात नसे कारण नंतर असे काही उत्तर मिळे की समोरचा अगदी गार होई.

           एके दिवशी आम्ही असेच चहा पीत बाहेर उभे होतो थंडीचे दिवस होते. तितक्यात तेथे एक म्हाताऱ्या आजी आल्या व हात जोडून म्हटल्या "बाळ... एक कप च्या... " त्यांचे वाक्य संपते नाही इतक्यात "पुढची वाट धरा.... " असे अपेक्षीत उत्तर आले.. मी त्या रस्त्यावर फेकलेल्या चहा कडे पाहिले एक कुत्रा तो चाटून त्याचा आस्वाद घेत होता. आजी तेथेच कुडकुडत बसल्या होत्या जणू काही मनात म्हणत होत्या.. 'हे पण केलं असत बाबा... पण माणूस म्हणून काही गोष्टी पाळाव्या लागतात.... ', माझी तळपायाची आग मस्तकात गेली.. मी त्या कडे गेलो एक चहा मागितला व म्हटलो " माणसाला नैवेद्य दाखवला तर गिऱ्हाईक कमी होणार नाही तुमचं... " मी तो चहा आजीला दिला व माझ्या कामाला निघून गेलो.

             दुसऱ्या दिवशी मी चहा प्यायला गेलो असता तेथे त्या आजी चहा पीत बसल्या होत्या त्यांनी कालचा प्रसंग पाहिला  होता, त्यांनी मला बोलावलं व म्हटल्या "आज च्या फुकट दिला.. म्हटला रोज ये.. " मी हसलो व चहा घेण्यास गेलो. आज चक्क मालक हसले व म्हटले "५ चहा.. बरोबर... " मी मान डोलवली.. आणि बाहेर येऊन बघतो तर काय आज रस्त्यावर चहाचा सडा पडला नव्हता.. आणि नंतरही कधी दिसला नाही....