खुणा

या इथे पानापानांवर,
माझ्या वह्यांच्या, पुस्तकांच्या
आहेत पसरलेल्या खुणा,
तुझ्या 'असण्या'च्या; माझ्या 'संपण्या'च्या...

कोठे आहे नाव तुझे
आणि कोठे प्रश्नचिन्ह त्यापुढे
बदाम कोठे सुंदर एखादा,
क्रूर बाण त्या आरपार चिरे...!

लिहिलेय कोठे मी 'सोड रे...'
आणि कोठे 'का' लिहिलेले,
माझी धाव सीमित शेवटी
या कवितेवरून त्या गाण्याकडे!

आहे कोठे शाई विरलेली,
मी म्हणतो पाणीच सांडलेले
आणि कोठे काळी खाडाखोड
माझ्या मनाचे ते काळेच कोपरे...

या इथे जाळलेला कागद,
त्या तिथे डाग काळवंडलेले
दिसत खरे शाई सारखे
पण रक्तानेच लिहिलेय ते नाव तुझे...!

खुणा या असल्या, पसरलेल्या
आशा-निराशा, अंधार-उजेडाच्या...
आहेत तुझ्याच त्या साऱ्या पण,
तुला कधी न कळलेल्याच....