आपल्या घरी

कशाच्या शोधापायी आज घर धूसर झाले?
हक्काची उब अन मायेचे हात धूसर झाले,
जिंदगी उजळण्यासाठी दिवे शोधत राहिलो
उजेडाने दिपली नजर अन घर धूसर झाले.

किती सुखात असतो जर आपल्या घरी असतो,
आपल्याच ढंगात असतो जर आपल्या घरी असतो.

निस्तब्ध हवा या इथे हा घसा कोरडा पडलेला,
गार पाणी प्यालो असतो जर आपल्या घरी असतो.

चंद्राचे तारकांमधून चालले शेखी मिरवणे,
चांदण्यात न्हालो असतो जर आपल्या घरी असतो.

झाकोळ अचानक आभाळी हे विजेचे कडाडणे,
असे कधी थरथरलो नसतो जर आपल्या घरी असतो.

वादळलेल्या या वळणावर वास खमंग पोट पोरके,
पोट भरून जेवलो असतो जर आपल्या घरी असतो.
000