'त्याचाच' सूर्य होतो

न थकता चाललं की
आपोआप मिळते वाट
अंधाऱ्या रातीमागेच 
लपलेली असते पहाट
होऊन स्वतःच मशाल 
जो खुशाल मार्गस्थ होतो 
सूर्य होतो त्याचाच 
'त्याचाच' सूर्य होतो 
मोडणाऱ्या काट्यांची 
त्याच्या पायात असते जागा
मनांच्या माळा गुंफणारा 
तोच होतो धागा 
कैक तत्वांचा सार 
त्याचे जगणे होते 
त्याचीच वाणी अभंग
अभंगवाणी होते 
मोह सांडून जो 
स्वतःस वाहून घेतो 
ज्ञानोबा होतो त्याचा
त्याचाच तुकोबा होतो 
वेडे म्हणणाऱ्या जगाला
तो वेड लावून जातो 
हाडा-मांसाच्या माणसाचा 
का उगाच देव होतो?
जयास तमा न तमाची 
कणा जयाचा ताठ
काट्यातून धीराने चाले 
त्या शूरास गवसते वाट
- संतोष खवळे