एकूणच खरेदी हा प्रकार मला न आवडणारा आणि त्यातही साडी खरेदी म्हणजे तर अंगावर भीतीचा काटा आणणारा.तरीही मोठ्या धाडसाने मी सौभाग्यवतीबरोबर जातो तेव्हां साडी तिने पसंत करेपर्यंत रस्त्यावरील रहदारी बघणे पसंत करतो.त्यामुळे माझा त्या घटनेतील सहभाग फक्त तिच्या पसंतीवर शिक्का मोर्तब करणे एवढ्यापुरताच मर्यादितअसतो.तिने पसंत केलेल्या अनेक साड्यांवर मात्र मी अगदी अभ्यासू व्यक्तीने द्यावे तसे मत देतो त्यामुळे तिलाही बरे वाटते अर्थात या माझ्या मतप्रदर्शनाचा उपयोग मी त्या साड्या पाहिल्या हे सिद्ध करण्यापुरताच असतो. पण अगदी क्वचितच माझ्या एकट्यावरच साडी खरेदी हा प्रसंग ओढवला आहे आणि क्वचितच असे घडत असल्याने त्या साड्या खरेदी करताना किंवा केल्यावरही घडलेल्या गोष्टी लक्षात रहाण्यासारख्या !
लग्नापूर्वी एकदाच मी माझ्या अखत्यारीत साडी खरेदी केली ती आईसाठी अर्थात माझी व्यवहारकुशल बहीण तेव्हां मला साथ द्यायला होती पण त्या खरेदीत तिच्याइतकेच मलाही लक्ष द्यावे लागले.माझ्या नोकरीच्या गावी म्हणजे औरंगाबादला आई वडिलांना घेऊन आल्यावर तिच्यासाठी माझ्या ऐपतीच्या दृष्टीने भारी साडी मी घेतली तिची किंमत होती ४७ रु.( त्यावेळी सोन्याचा भाव होता एक तोळ्याला दीडशे रु.)तिला केवढे धन्य वाटले होते त्यावेळी. मात्र साडी मिळाली यापेक्षा शेजाऱ्यांनी "वा,लेकाने मोठी भारी साडी आणली बघा " असे तिचे कौतुक केल्याचाच तिला जास्त आनंद झाला.
लग्न ठरल्यावर वाग्दत्त वधूसाठी साखरपुड्याची साडी घेण्याचे काम मलाच करावे लागले.अर्थात ते काम मी माझा खरेदीतील आळस पूर्णपणे बाजूला सारून बऱ्याच उत्साहाने केले.त्यावेळी मला मदतीस आला होता माझा लग्न न झालेला धाकटा भाऊ.जरी आम्ही दोघांनी अगदी मोजून पंधरा मिनिटात ते काम आटोपले होते तरीही त्या बिचाऱ्याने तेवढ्या एकाच अनुभवावरून संसारातील कटकटींची पूर्ण जाणीव झाल्यामुळेच की काय कोण जाणे लग्न न करणेच पसंत केले.
त्यानंतरची मी एकट्याने केलेली साडीखरेदी मात्र फारच फुरसदीने आणि माझ्या खिशाला फारशी तोशिश न लागता झाली.त्यावेळी मी औरंगाबादला नौकरीत होतो आणि पुण्याला पुढच्या शिक्षणाच्या कारणाने एकटाच आलो होतो.पावसाळ्याचे दिवस होते आणि मी एकटाच लक्ष्मीरोडवरून फिरत होतो आणि त्याकाळात असणाऱ्या सेलच्या जाहिराती सगळ्या दुकानांवर लटकत होत्या,काहीच उद्योग नसल्यामुळे शिवाय लग्न नुकतेच झालेले असल्याने बायकोला खूष करण्याचे विचार डोक्यात मधूनमधून डोक्यात यायचे त्यामुळे अशाच एका दुकानात मी शिरलो आणि एका मला बऱ्या वाटलेल्या सेलवरील साडीची किंमत विचारली आणि अगदी विचारही न करता घेऊन टाकली कारण त्या साडीची किंमत होती फक्त सात रुपये(ही गोष्ट १९७१ सालची आहे.आता रुमाल तरी या किंमतीत येतो की नाही शंकाच आहे ).मी विचार केला समजा बायकोला नाहीच आवडली तिच्यासाठी साडी आणली एवढा लौकीक तरी पदरी पडेल आणि सात रुपये त्यासाठी फार जास्त आहेत अशातला भाग नाही. औरंगाबादला गेल्यावर भीत भीतच तिला साडी दाखवली.फिकट चॉकलेटी रंगाची जाळीदार अशी साडी होती ती आणि आश्चर्य म्हणजे तिला ती खूपच आवडली आणि किंमत ऐकल्यावर तर नवऱ्याच्या व्यवहारचातुर्यावरचा विश्वास चांगलाच वाढला अर्थात त्यामुळे अर्थखाते तिने हातून जाऊ दिले नाही ते वेगळे,पण ती साडी तिलाच नाही तर सगळ्यांनाच आवडली .शेवटी ती साडी पार जुनी झाल्यावर तिचे पडदेही आमच्या घराच्या खिडक्यांवर बरेच दिवस लटकत होते.
त्यानंतर मी पत्नीसमवेतच सोलापुरात असताना साडीखरेदी केली ती लक्षात रहाण्याचे कारण मजेशीर आहे. आम्ही पॉलिटेक्निकच्या आवारात राहात होतो तो सगळा साळी लोकांचा भाग.त्यामुळे तेथील दुकानेही त्यांच्या आवडीला आणि त्यांच्या पद्धतीच्या खरेदीला अनुकूल असणाऱ्या प्रकारची असत.जवळच्याच अशाच एका दुकानात आम्ही त्यावेळी पत्नीला रोजच्या वापरासाठी घेताना चांगली दिसणारी पण कमी किंमतीची साडी खरेदी केली.घरी नेऊन थोडी वापरून धुण्यास टाकल्यावर तिचा रंग अगदी सहज पाण्यात जातो आहे हे पत्नीच्या लक्षात आले मग आम्ही दोघेही त्याच दुकानात गेलो आणि त्याला सर्व हकीकत सांगून साडी बद्लून द्यायला सांगितल्यावर त्याने काय म्हणावे?"अहो रंग जातोय ना मग आणखी जाऊद्या ना जास्तीत जास्त रंग गेल्यावर आणा आणि मग बदलून घेऊन जा" आमचा त्याच्या सांगण्यावर विश्वासच बसेना पण त्याने पुन्हा पुन्हा सांगितल्यावर आम्ही परत गेलो आणि ती साडी चांगली चारपाच महिने वापरून तिचा रंग अगदी ओळखून येईनासा झाल्यावर पुन्हा त्या दुकानात गेलो आणि खरोखरच त्याने काहीही आढेवेढे न घेता ती साडी बदलून दिली. या बदलून दिलेल्या साडीचा मात्र रंग पक्का होता आणि त्यानंतर ती टिकलीसुद्धा बरेच दिवस.
त्यानंतर बऱ्याच दिवसांनी मैसूरला शैक्षणिक शिबिरासाठी मी एकटाच गेलो त्यावेळी अर्थातच मी बेंगलोर सिल्क साडी घेऊन येणार याविषयी सौभाग्यवतीला खात्री होती.पण काही कारणाने मला साडी खरेदीस वेळ मिळाला नाही.त्यामुळे आपल्याला घरात प्रवेश करणे मुश्कील होईल असे वाटले,पण देवाला माझी काळजी असावी,कारण परतताना बंगलोरमध्ये एका लॉजमध्ये उतरलो.तेथे रात्र काढायची होती.त्याच लॉजमध्ये मैसूरचा एक साडीचा व्यापारी उतरला होता.त्याला मराठी बोलता येत होते.माझ्या मित्राबरोबर बोलत असताना त्याने ऐकले आणि आम्ही परत आपल्या खोलीत शिरत असताना त्याने आम्हाला गाठले आणि आपल्याबरोबर आणलेल्या रेशमी साड्या पहाण्याचा आग्रह केला आणि त्याच्या आग्रहामुळे आम्ही दोघांनीही त्याच्याकडून काही साड्या खरेदी केल्या आणि घरी गेल्यावर बरीच वहावा मिळवली.
बस्स ! आयुष्यात मी स्वत: लक्ष घालून केलेली एवढीच साडीखरेदी . तशी लग्नकार्यात घाउक प्रमाणात साडीखरेदी करण्याचे बरेच प्रसंग आले पण त्यावेळी बराच मोठा जनसमुदाय बरोबर असल्यामुळे,त्यांच्या पसंतीवर नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया व्यक्त करून अखेर ते म्हणतील त्यालाच मान डोलावणे एवढेच काम मी केले आहे.