आठवतं का रे तुला?

आठवतं तुला ते चोरून भेटणं;

भर उनाचीही सावली होणं;

निमिषभर तुला बघायचं म्हंटल;

तर वेळेचं घड्याळंच संपून जाणं.

शब्दांचा खजिना घेउन;

आपलं अबोल होणं;

अन् शपथांच्या खेळामधलं;

ते लोभसवाणं जगणं.

असे किती एकांत तेव्हा;

तुझ्या असण्याने गजबजले होते;

अन् या जगाच्या कोंडाळ्यात;

आपले विश्व वेगळे होते.

तुझं मला सोडून जाणं;

जाताना मौनात गुदमरणं;

माझं अश्रूंना सावरणं;

अन् स्मीतचांदणं पसरवणं.

आपल्या दोघांच्याही वाटा;

नव्या गावाला चाललेल्या;

अक्षता झेलत झेलत;

मनाने तुझ्याशी सप्तपदी चाललेल्या.

ही प्रतारणा होती का नव्हती;

याला आता अर्थच नाही;

होईल कधीतरी सोपं अन् सरळं;

म्हणूनतरं मी चालत गेले हे वळण.

पण तुझ्यामाझ्यातलं वाढलेलं अंतर;

भरलंच नाही रे कधी नंतर;

सप्तपदी,अक्षता,मेंदी अन् सनईचं;

वावडंच होतं तुझ्यामाझ्या नात्याला खरंतर.