दे टाळी !

 मन म्हणाले डोळ्यांना
गच्च मिटून बसायचं
लुटलं मारलं नाहीच बघायचं
मग नाही रे कांही कटकट
द्या टाळी!

मन म्हणाले कानांना
बोळे कोंबून बसायचं
भलं नि बुरं नाहीच ऐकायचं
मग नाही रे कांही कटकट
द्या टाळी!

मन म्हणाले पायांना
मूर्तीसारखं थिजायचं
चालणं धावणं नाहीच करायचं
मग नाही रे कांही कटकट
द्या टाळी!

मन म्हणाले मुखाला
मूग गिळून बसायचं
खरं नि खोटं नाहीच बोलायचं
मग नाही रे कांही कटकट
दे टाळी!

हात म्हणाले मनाला
या तर षंढांच्या टाळ्या
पुरुषार्थ नको जर तुम्हाला
मग टाका छाटून आम्हाला!!