निर्भेळ आठवणींचा आनंद
परवा एका मित्राकडे गेलो होतो. तिथे एक पाच- सहा वर्षाची चिमुरडी आली
होती. म्हणत होती की, तिचे डॅड तिला व तिच्या काही फ्रेंडसना घेऊन येत्या
संडेला बोरीवली नॅशनल पार्क व नेक्स्ट संडेला माहीम नेचर पार्कला फुलझाड
,मोठी झाड , जंगल दाखवायला नेणार आहेत म्हणुन. मला एकुन आश्चर्य वाटल. खरच
हल्लीच्या मुलांना छोटी छोटी सुंदर फुलझाड, त्याला लागलेली सुवासिक फुल,
बोर, जांभुळ यांची झाड खरंच कुठे दाखवायलाच उरली नाहीत. सगळीकडे
रिडेव्हलपमेंटमुळे टॉवर्स उभे होतायत. काही काही ठिकाणी बागा आहेत पण तिथे
शोभेचीच झाडे जास्त. मला माझ बालपण आठवल.
मी लहान असतांना एका बैठया चाळीत रहात होतो. पुढे व्हरांडा . त्याला
पार्टिशन लावलेल. मधली खोली व मागे स्वयंपाकघर. आमची चाळीत शेवटची खोली.
त्यामुळे आजुबाजुला खुप मोकळी जागा होती. पुढे मोठ्ठे अंगण. अंगणाला छोटया
झाडांच वेलींच कुंपण. अंगण नेहमी शेणाने सारवलेल असायच.
घराला लागुनच ताडाचे झाड होत. चांगले चार मजली उंच. ताजे ताडगोळे
म्हणजे छोटेसे शहाळच. ति ताडगोळे काढणारी माणस पायात ताडाच्याच
झावळ्यांच्या पासून केलेली रिंग घालायचे, व हाताने पटापट वर जायचे. वरुन
ताडगोळ्याचा लोंगर तोडून दोरीने हळुच खाली सोडायचे. पाणीदार लुसलुशीत
ताडगोळे म्हणजे अमृतच वाटे. शिवाय ताडीकरता वरती झाडाला ताडगोळे
येण्याच्या आधी जो कोंब येतो तो हलकासा छाटुन त्याला ति माणस एक मडक
बांधायचे. मला आठवतय की सकाळी जेव्हा उठून बाहेर यायचो तेव्हा बऱ्याच वेळा
ते वरील मडके ताडीने भरुन वहावत असासयचे व थेंब थेंब ताडी खाली पडायची.
घरातल्यांची नजर चुकवुन तो थेंब तोंडात घ्यायची आमच्या लहान मुलात स्पर्धा
असायची, कारण वरुन येतांना ऊंचिमुळे व वाऱ्याने बऱ्याच वेळो तो थेंब
चेहऱ्यावरच पडायचा. पिकलेले तांबुस झालेले ताडगोळे ही बऱ्याचवेळा खाली
पडायचे. मला आठवतय की एकदा बाहेर आमची नवारीची बाज होती. त्यावर तो पडून
तिच्या एका बाजूचे दोन तुकडे झाले होते. पण नशिबाने आमच्या जाणाऱ्या
येणाऱ्याच्या अंगावर ते कधीही पडले नाहीत.
त्याला लागुनच दोन केळींची, एक पपईच व शेवग्याच्या शेंगांच झाड होत.
हिरवे आंबे काढुन पिकवण्यासारखेच आम्ही हिरव्या केळीचा लोंगर काढून तो एका
मोठया पोत्यात बांधुन ठेवायचो. काही दिवसातच तो पिकल्यावर असा काही वेगळाच
वास सुटायचा की बस. शिवाय पापडाच पिठ भिजवतांना ती केळ हळुवार खालून
अर्धाफुटावर कापुन तीच्या खोडाच आतले पापुद्रे काढून ते पिळुन त्याच पाणी
काढायच व त्या पाण्यात पापडाच पिठ भिजवायचे. पपई पण कधी मधी आपला केशरीपणा
आमच्या तोंडावर ठसवायची. ताज्या शेंगांच पिठल, शेगांची आमटी, शेवग्याच्या
पाल्याची भाजी हा ठरलेला मेनु. ह्या झाडांपुढे लगेच सिंगल तगर, डबल तगर,
मोगरा, लिली, पारिजातक, अनंत, जाई-जुई , क्रुष्ण्कमळ , इतकी फुलझाड
असायची. पारिजातकाचा तर सकाळि खालि सडाच पडलेला असायचा. पण तरिहि
त्यांच्या फांद्या हलवुन त्याच्या खरखरित पानांवर राहिलेल्या फुलांचा सडा
अंगावर पाडुन घेण्याचि मजाच वेगळि. त्यात पावसाळ्यात भर पडायची ति तेरडा व
गोकर्ण . गणपतित तर फुल आणि वेगवेगळ्या पानांच्या पत्रिंचा तर खच असायचा.
पावसाळ्यात आमच्या भिंतीला लागुन दरवर्षी नुसते अळुचे रान यायचे. त्यात
एखाद्या वर्षी काही काही ठिकाणी खाजर अळु यायच. अळु कापताना काही वेळातच
हाताला खाज यायची. मग ते खाजर असेल तर चिंच जास्त टाकुन त्याला खाताना आई
निवळायचा प्रयत्न करायची. त्यामुळे पावसाळ्यात अळुची भाजी, वडया, फदफद
यांचा पुर यायचा. अळुच्या पानावर पडणारे पावसाचे थेंब पडताना बघण हाही एक
अनुभव असायच. बारीक बारीक पाऊस असेल तर पानावर मध्यभागी हळुहळु पाण्याचे
थेंब जमा व्हायचे व त्याचा जडपणा पानाला सहन न होईसा झाला की ते कुर्निसात
केल्यासारखे पटकन पुढे होऊन परत पाणी अंगावर झेलायला तयार. पाऊस जोरात
असेल तर फक्त हि क्रिया भराभर व्हायची.पावसाळ्यात अंगणातल्या कंपाऊंडवर
घोसाळ्याचा वेल यायचा. खाली ओव्याची ही झाड यायची. घोसाळी, ओव्याचि पान ,
केळी यांची भजी व खरपुस अळुवडया यांचा बेत खरच वेड लावायचा.
आमच्या घरा समोरच एका पांगाऱ्याच झाड होत. आधी त्याला मस्त लाल लाल तुरे
यायचे व पुढे त्याच्या शेंगा व्हायच्या. झाडावरच त्या वाळून खाली पडल्या
की त्यात साखरफुटाण्याएवढया लाल बिया असायच्या. अनोळखी कोणी मुलगा किंवा
मित्र आला की आम्ही सर्वजण त्याला मुद्दाम सांगायचो की लाल शेंग दगडावर
घासुन हाताला टेकव , थंडगार वाटेल. पण व्हायच उलटच. कारण ही घासल्यावर
त्याचा एकदम चटका बसतो.
आमच्या समोरच बोर व जांभळाचे झाड होते. झाडावर चढुन बोर खाण्यात जी मजा
आहे ती खरच कशातच नाही. पिकलेल्या फांदीच्या टोकावरच बोर काढताना बोटावर
एक टचकन काटा टोचला की मग ते खाताना त्या बोराच्या आंबटगोड चवीला जी जीभ
दाद देते त्याला तोड नाही. घशाला दाठरा येईस्तो जांभळ मि खाल्लीत. तेव्हा
जीभ व दात जे जांभुळलेले व्हायचे तेव्हा घरी घेऊन चुळ भरल्यावर आम्ही जे
पाणी पडेल त्याला शाई शाई अस म्हणत असू.
तिथेच बाजुला एक मेव्याच झाड होत. प्रचंड मोठ. त्यावर मोठया प्रमाणात
करंगळीच्या वरच्या पेरा एवढी लांब लांब फळ येत. आम्ही त्याला मेवा म्हणत
असून. पिकलेले मेवे, त्याचा रवाळपणा आजही माझ्या जिभेवर आहे. आमच्या
बाजूच्या घराशीच एक उंबराच झाड होते. उंबर पिकल्यावर लाल झालेल्यातुन थोडे
उडणारे किडे बाजूला करुन ती खाताना अंजीराचीच आठवण यायची.
हल्ली कधी तरी मला ह्या नवीन पिढीतल्या मुलांचा हेवा वाटायचा की आता
ह्यांना केवढे मोठे एक्स्पोजर मिळत. आमच्या वेळी अकरावी झाल्यावर सायन्स,
कॉमर्स व आर्टस् एवढीच स्टेशन होती. आता तर प्रत्येक शाखेत केवढे
ऍव्हेन्युज आहेत. पण त्या मुलीचे बोलणे एकल्यावर मला मनात थोडस का होईना
पण वाटल की अरे, जी ही मुलगी बोलत आहे त्या सुखाला आपण मुकलो नाहीत.
माझ्या अंगात सुखाचा सदरा होता पण त्यात कधी मि डोकाऊन पाहिलच नाही. आता
खिसाभरुन का होईना पण निर्भेळ आठवणींचा आनंद तर मला मिळाला.