आजी...

पाठीत वाकली आजी, बसते खिडकीच्यापाशी
आठवीत असते काही, ती बडबडते स्वतःशी ।

चेहऱ्यावर सुरकुतलेल्या, असतात गूढसे भाव,
बडबडीत आणिक येतो, हमखास कुणी तरी देव ।

अस्तित्व तिचे कोणाला, फारसे जाणवत नाही
ती 'आहे' इतके पुरते, बाकीचे.... म्हणवत नाही ।

गेलेच जवळ जर कोणी, ती अतिशय प्रेमळ हसते,
पण बोलत नाही काही, नुसतीच एकटक बघते ।
----------------------------------------

परवाच्या सुट्टीमध्ये, भेटलो तिला वर्षाने,
तो थकलेला चेहराही, उजळला नव्या हर्षाने ।

भेटून घरी सगळ्यांना, मी बसलो तिच्या पुढ्यात,
गालांवरुनी फिरले अन, थरथरते प्रेमळ हात ।

मायेने मोडून बोटे, आजीने पुसले डोळे,
त्या ओलाव्याने तेव्हा, माझेही भरले डोळे।
----------------------------------------

संपली शेवटी सुट्टी... मन झाले पुन्हा उदास,
घर सोडून पुन्हा निघालो, परतीची घेउन आस ।

वाकलो नमस्काराला, आजीच्या पुढती जेव्हा,
फिरले थरथरते हात, माझ्या पाठीवर तेव्हा ।

'सांभाळून जा' हे, आजी बोलली तिच्या हातांनी,
'ये लवकर परतून आता' बोलली तिच्या डोळ्यांनी ।
----------------------------------------

इकडे मी गुंतून असतो, कामात रोज ठरलेल्या,
परतीची स्वप्ने बघतो, वेळात रोज उरलेल्या ।
----------------------------------------

अजुनीही आजी बसते, एकटीच, खिडकीपाशी...
आठवीत असते काही, ती बडबडते स्वतःशी...