रिमझिम रिमझिम पाउस यावा,मन आनंदावे ।
अलगद नवथर सूर फुलावा,मी गाणे गावे ।
अविरत पडत्या जलधारांचा गगनी ओलावा,
शब्द तयांचा सर्वस्वाच्या कानी झेलावा ।
झऱ्यास यावा तारुण्याचा फिरुनि नवा जोष ।
धरेस गात्रा-गात्रांमधुनी व्हावा संतोष ।
श्याम घनांची भरून जत्रा, गडगड कल्लोळ,
निसर्गदेवा आर्तिक्याचा तडित्प्रभालोळ ।
कुणी नसावे रिते, पोरके, एकाकी कोणी
सनाथ सारे धरा, वने, खग, अन् सारे प्राणी ।
उत्साहाचा होवो उत्सव, आंदण सौख्य मिळो,
नसोत चिंता-क्लेश कुणाला, सकलहि दुःख जळो ।
कणाकणातुन चैतन्याचा गंध नवा ताजा,
चैतन्याप्रति, चैतन्याची ही साधी पूजा ।