संपुर्ण वातावरण मंतरलेले
सौंदर्याने नखशिखांत माखलेले
हेलकावणाऱ्या वेलींचे नर्तन
निसर्गाचे विलोभनीय वर्तन
डोंगराच्या गोबऱ्या गालांना
खळीच पडली जणू हसताना
नम्रपणे इंद्रधनुष्य लपवे नजरा
प्रतिबिंब लाजून लपवे चेहरा
मादकधुंद छान पावसाळी हवा
मृदगंधीत बोचरा थंडावा
क्षण एक ऊन्हे कपारीत बागडली
अन देवधनुकली भुमीला स्पर्शली
अंथरल्या पायघड्याच सप्तरंगी
ऊर्मीच उधळली अंगोअंगी
बहारदार दवबिंदू भुपृष्ठावर
थाटात उतरला इंद्र जमिनीवर