जे घर माझे होते
ते घर आता माझे नाही
मी कशास जाऊ तेथे
मज मुळीच करमत नाही
ते घर जेह्वा होते माझे
मी मस्त कलंदर होतो
तारूण्याच्या मस्तीने मी
मस्त झिंगलो होतो
ते निळे निळे आभाळ
मज सतत खुणावत होते
देवाची ती करुणा
मन माझे फुलवीत होते
मी वांड वळू जैसा
मी माजमाजुनी होतो
ह्या शिंगाच्या टोकावर
हे जग भिरकावत होतो
ते घर होते माझे की
की स्वप्न सुखाचे होते
ते बघता बघता
कसे हरवून आता गेले
ह्या खिडकीच्या भिंगाला
मी नजर लावूनी बसतो
हे निळे निळे आभाळ
मी भिंगुळवाणे हसतो
मन माझे मजला म्हणते
हे असे कसे हो जगता
हे मरत मरत जगणे
हे निव्वळ ओझे आता ........../