हिंदू वाचल्यानंतर. अर्थात, एक होती कोसला

मित्रहो,

'हिंदू' वाचल्यानंतर आम्हाला बरेच काही झाले. सामान्यतः त्याला 'त्रास' असे म्हणतात. तर मनातले सगळे कागदावर मांडून टाकावे या विचाराले काही लिहिले गेले. ते येणेप्रमाणे -
---------------------------------------------------------
एक होती कोसला, सांगे पांडुरंगाचे आर्त 
बेफिकिर वयामधले विविध रंग उदाहरणार्थ 
पुण्यामधले उणे होते, शब्दांचे मोहक दर्शन होते
सांगवीतल्या बांधवांचे भयचकित जगणे होते
भावनांचा ओघ होता, अलम दुनियेचा शोक होता
कॉलेज, कट्टा, हॉस्टेल, मद्रास - सर्वत्र साल्या जगण्याचा मुळारंभ जोक होता
पांडुरंगाच्या लीळा होत्या, रमीचे हुरहुरते चरित्र होते
'आपण घ्रर करुया' हे वाचल्यावर, आमच्याही मनात गलबलले एक चित्र होते
भाषेचे वैभव अफाट होते, शैलीचा मानदंड होता
भकास भंकस जाणिवांचा, आम्ही वेचला आनंद होता
मनूचा मृत्यू भिडला होता, बधीर होऊन रडला होता
आयुष्याच्या भयाण पसाऱ्याकडे हताशपणे बघत हसलाही होता
कोसला म्हणजे जरा फारच, कोसला म्हणजे अगदी अशक्यच, 
कोसला म्हणजे व्याख्येतून मुक्त,कोसला म्हणजे हेमुक्त, तेमुक्त, 
कोसला म्हणजे आभाळाकडे डोळे लावून एकटयाने म्हणायचे एकटयाचे सूक्त
मग आम्ही हिंदू वाचली. 
आणि मग आम्ही टरकलो.
येणार येणार म्हणून गाजत होती, आमची उत्कंठा वाढवत होती
प्रकाशनपूर्व कीर्ती, गगनांतरी पोचली होती
अगोदरच राखून ठेवलेली प्रत बरीच वाट बघितल्यावर हाती आली
सहाशे पानांची सुबक बांधणी बघून वाटले, चला - प्रतीक्षा सार्थ झाली
मात्र कथा पकड घेईना, तपशीलातून बाहेर येईना
तपशीलाचे कौतुक वाटे, पण 'कादंबरी'चे रुप थिटे
कालखंडाची गडबड आहे, गोष्टीच्या धाग्यांचा गुंता आहे,
मध्येच काही प्रसंग विलक्षण, पण एकूणात जरा चिंताच आहे
खंडेराव खूप काही बघतो आहे, आम्हीही बापडे बघतो आहोत
पण सुसूत्रतेचे काय झाले - याचे उत्तर शोधतो आहोत
तपशीलाचा प्रश्नच नाही, मोठाच पट उभा राही
पण तपशील म्हणजे शेवटी मालगाडीचे डबे - वाहतूक होई पण घाटाची मजा घ्यायला कुणी नाही 
अशा वेळी आठवे कोसला अन् ती झपाटलेली भाषा
लहानशाच आयुष्याच्या प्रचंड अनुभूतीची नशा
हिंदुरावांचे नाव मोठे, म्हणून त्यांना साकडे,
इथून पुढल्या खंडांना, द्या कादंबरीचे रुपडे
मायमराठीत कादंबरीच नाही अशी म्हणे हिंदुरावांना बोच,
असं काय करता मालक, वाचा की एकदा - मुंबई दिनांक, मृण्मयी आणि तुंबाडचे खोत!
---------------------------------------------------------
आमचा स्वतःविषयी कुठलाही साहित्यिक गैरसमज नाही. त्यामुळे हे असं सगळं लिहायला तुम्ही स्वतःला कोण समजता असं जर कुणी विचारलं तर आम्ही ' आम्ही कोण म्हणुनी काय पुसता, आम्ही असू खेळाडू अकरावे' असं बाणेदार उत्तर देऊ. तेव्हा नकळत कुणी (हिंदुराव धरून) दुखावले गेले असल्यास क्षमस्व.
आभार,
उत्पल