मम जीवनधारा

उगी वाहत असतो,उतार सापडेल तिकडं 

अफाट ताकद असते माझ्यात, नसते मात्र दिशा 
ती शोधण्यासाठीच देहभान विसरतो, 
दिशाभूल न होऊ देता.
खरं तर माझं वाहणंसुद्धा नसतं माझ्या हातात 
माझं काय असतं तेच कळत नाही 
उत्तर मिळेल कधीतरी कळेल म्हणून 
वाहत मात्र असतोच 
झरा म्हणून वाहता वाहता 
माझा ओढा होतो नकळत 
खाच-खळग्याना मिठीत घेऊन 
तसाच पुढे धावत असतो 
मी धावत असतो 
माझं डबकं होऊ नये म्हणून 

पाषाण चिरत डोंगर-दर्यातून फिरताना 
घ्यावं लागतं घळई म्हणून 
झोकून द्यावं लागतं स्वतःला 
खोल दरीत धबधबा बनून 
सदा आदळत आपटत राहतो 
तरीही मी वाहतोच 

सोसल्यावर एवढं सारं 
प्रवाह मंदावतो हळूहळू 
अट्टाहास एवढा कशासाठी 
शेवटी शेवटी लागतं कळू 
वरून शांत होत जातो
मी आत आणखी खोल वाहतो 
कळते वाहणे धर्म होता 
आता साध्य झाले कर्म 
 रुंदावते उल्हासून छाती 
मज वाहण्यातले कळता मर्म
 
मग अखेर अस्तित्व हरवून हसतो 
सागरास मिळताना मी माझा नसतो