....................................
विरोधाभास!
....................................
मी तुझा संशय; तुझा विश्वास मी!
केवढा मोठा विरोधाभास मी!
मीच जाचू लागलो आहे मला...
द्यायचा आता कुणाला त्रास मी?
राखली नाहीस माझी बूज तू...
ठेवली नाही तुझी पत्रास मी!
भोवती झाले पुन्हा गोळा बघ्ये
मांडली माझी पुन्हा आरास मी!
वाटते माणूस व्हावेसे मला
या विचाराने ठरे मागास मी!
ही असावी जन्म घेण्याची सजा
भोगला आजन्म कारावास मी!
अर्धभरलाही नको किंवा रिता....
टाकला फोडून माझा ग्लास मी!
नीट मी नाही कुणाला भेटलो...
बोललो नाही कुणाशी खास मी!
मी कवी ज्ञाना-तुका यांच्यामुळे
घेतला त्यांच्याच देही श्वास मी!
- प्रदीप कुलकर्णी
...............................
रचनाकाल : २०-१०-२०१०
...............................