भाग्य माझे केवढे!

जाहला स्मृतिभ्रंश मजला भाग्य माझे केवढे!
आठवांचे पाश आता घालती ना साकडे

काय होतो काल मी अन कोण माझे सोयरे?
सर्व ते तिमिरात लपले मज कुणी ना सापडे

माय मजला ही असावी आठवेना ती कशी?
तिजविना मज छत्र कोठे? काळजा जाती तडे

राम मी विसरून गेलो  कृष्णही पुसला असे
एकही आदर्श नसता कोणते गिरवू धडे?

रोग जडला राज्यकर्ते विसरती अश्वासने
मेळ कुठला? बोलण्याशी वागण्याचे वाकडे

राज्य चालावे कसे हे? दुष्ट ते सिंहासनी
पाप नववस्त्रात सजले पुण्य झाले नागडे

स्नान ते गंगेत करती पाप मुक्ती साधण्या
बाटली गंगाच त्यानी पाप त्यांचे एवढे

चोरही दिंडीत दिसती चालता पंढरपुरी
संग होता असंगाशी माळ तुळशीची रडे

चालतो मी सरळ मार्गी लोक का हसती मला?
मुल्य नसणाऱ्या जगाला चाल तिरकी आवडे

सूर्य का अंधार मागे? झाकण्याला चेहरा
मातला अंधार इतका तेज झाले तोकडे

कर्ण मरता प्रेतयात्री मोजके होते तरी
कुंडलाना मिळवण्याला राख जो तो सावडे

थोर तू "निशिकांत" तुजला नाव आठवते तुझे
नाव मागे ठेवण्याला वाजवी जग चौघडे

निशिकांत देशपांडे मो.न. 98907 99023
E Mail: दुवा क्र. १
प्रतिसादाची प्रतिक्षा
दुवा क्र. २