ती दिवाळी खरी दिवाळी होती
वसु-बारसपासून दिवाळीला सुरवात होत होती
मस्त थंडी हाडापर्यंत झीरपायची
नि त्यात अशी ती दिवाळी
चकल्या शेव नि अनार्ष्याची
अंगाला उटणे लावण्याची
सकाळी सकाळी फराळ करायची
नव्या कपड्याची
अशी मस्त दिवाळी होती !!
मातीचे का होईना
घर होते ...!!!
घरापुढे मातीचे अंगण होते
नि त्यावर आईने घातलेली सडा-रांगोळी
रात्रीच्यावेळी पंत्याची
टिकली एवढी रोषणाई
ती खरी प्रकाशाची दिवाळी होती !
एखादा लवंगी सर
एखादा लक्षुमी बोंब
एखादी सुरसुरी , एखादी तूनतूनतार !!
बस एवढेच मिळायचं !
चार भावंडात ते वाटले जायचे ...
तरी किती छान वाटायचे !
श्रीमंत श्रीमंत वाटायचे
फुसका लवंगी सर मग त्यातला एक एक फटाका
वाटला जायचा चौघात
त्याला मध्ये दुमडून पेटवला जायचा
सुईकन सुरसुरी उडायची
अंगण प्रकाशाने गच्च होऊन जायचे
घरचा आकाश कंदील
तो लाल कागद .तो हिरवा कागद
तो चंद्र ते विमान ती चांदणी
लाल,पिवळी,हिरवी
जिलेटीनचा कागद !!
त्यातून ठीपकणारा पणतीचा प्रकाश
ठिपक्या ठिपक्याने सांडणारा
जीव हरवून जायचा ...
तो सोहळा बघून !!
ती खरी दिवाळी होती
शप्पत!! माझ्या काळजात घर करून होती ...!!
खेड्यातून ह्या महानगरात येऊन पडलो
अचानक ...
पोटासाठी ...!!
नि मातीचा सुगंध हरवला
येथे प्रकाशाची दिवाळी
डोळे दिपवणारी दिवाळी
दिवाळी आली आली...गेली गेली
हजारो फटाके एका ओळीत स्फोटाच्या आवाजाने
कान फुटायला लावणारी दिवाळी !!
भय वाढवणारी दिवाळी ....
दिवाळी आली कधी नि गेली कधी
येथे कधी कळतच नाही ....
मी माझ्या घरात
फटाक्याचे आवाज ऐकत
कान बंद करून सुन्न !!
मी माझ्या गावची दिवाळी आठवत
हरवून जातो
माझ्या गोड स्वप्नात ....!!!!