चाकोरी सोडून जगावे पटले नाही
ऊंच भरारी घ्यावी मजला सुचले नाही
घासत असतो दात सकाळी सायंकाळी
आईच्या नियमास विसरणे घडले नाही
चाळीसा मी हनुमानाची रोजच म्हणतो
बलशाली का मी ही व्हावे ? कळले नाही
देव कधी का जेवण घेतो मिष्टान्नाचे ?
नैवेद्याचे ताट कशाला ? पुसले नाही
एकासाठी एकच पत्नी शिकवण होती
रामच झालो कृष्ण बनावे गमले नाही
मध्यमवर्गी मी फरफटलो , नाते तुटले
गरिबीसंगे, श्रीमंतीशी जुडले नाही
साधी भाषा साध्या गजला आशय साधा
अवडंबर अवघड शब्दांचे जमले नाही
रंगबिरंगी जीवन नव्हते मान्य मला पण
वैषम्याचे पाउल दारी पडले नाही
पापभिरू असणे आवडते "निशिकांता"ला
रूढीच्या परिघाशी नाते तुटले नाही
निशिकांत देशपांडे मोंअ. ; - ९८९०७ ९९०२३
E Mail;-- nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची प्रतीक्षा