सरले कवित्व तेव्हा भेटावयास आले

सरले कवित्व तेव्हा भेटावयास आले
जे शब्द पांगलेले, ते सांत्वनास आले

चिरयौवना, चिरायू, स्वैरांगना तरी का
स्मितहास्य अप्सरेच्या ओठी उदास आले ?

वाटे हवेहवेसे ते सर्व लाभल्यावर
का फोल संचिताचे मज प्रत्ययास आले ?

त्या सावळ्या तनूची सुरभि वसंतकाली
बहरून गंध जैसे नीलोत्पलास आले
 
आभार अक्षरांचे, ऋण शब्दसंचयाचे
अवकाश कल्पनांचे बुजवावयास आले

आजन्म अक्षरांची केल्यावरी मशागत
कवितेत अर्थ काही अर्थांतरास आले