दु:ख आता फार झाले

दु:ख आता फार झाले
स्वप्नही लाचार झाले
दु:ख आता फार झाले
झोपलेले ते निखारे
जाग येता गार झाले
झुंजण्याची वेळ येता
शौर्य-धैर्य बिमार झाले
झुंजणारे वीर खंदे
आरशांचे हार झाले
खेळ येथे माकडांचे
या भुईला भार झाले
पान कोरे अक्षरांना
सांगते आचार झाले
बांधलेली भोवताली
भिंत होती दार झाले
उत्तरांना पेलताना
प्रश्नही बेजार झाले
"अभय"तेच्या ’त्या’ नशेचे
बंद आता बार झाले
........गंगाधर मुटे...........