मीच मजला भार झाले
दु:ख आता फार झाले
मातृगर्भी वाढतांना
कैक मजवर वार झाले
पोरगी जन्मास येता
पुण्यही बेकार झाले
तोच जगती भाग्यशाली
पुत्र ज्याला चार झाले
आवडे हसणे परंतू
आसवांची धार झाले
आदिशक्ती मी पुराणी
आज अबला नार झाले
टाळणे नजरा विषारी
जीवनाचे सार झाले
मी जरा फुलताच भुंगे
शोषणारे यार झाले
नोकरी धरता तिथे मी
काय गजबज बार झाले !
कोण आले मज लुटाया ?
किलकिले का दार झाले
शील रे "निशिकांत" विकण्या
चहुकडे बाजार झाले
निशिकांत देशपांडे मो.न. ९८९०७ ९९०२३
E Mail :- दुवा क्र. १
प्रतिसादाची अपेक्षा