बेगडी अन चमकणारे चेहरे मी पाहिले
चेहऱ्याना झाकणारे चेहरे मी पहिले
कळवळा गाळातल्यांचा राज्यकर्ते दावती
आरशाला फसवणारे चेहरे मी पाहिले
भाग्य मंत्र्यांचे तयाना पक्ष श्रेष्ठी पावली
जी हुजूरी वाकणारे चेहरे मी पाहिले
मी करू चिंता कशाला मुल्य जपण्याची फुका?
लाख टोप्या बदलणारे चेहरे मी पाहिले
शुभ्र खादी, देश भक्ती, त्याग झाले पोरके
तत्त्व पायी तुडवणारे चेहरे मी पाहिले
भूक पोटी, रंग ओठी खुणवती वारांगणा
देह विक्रय करवणारे चेहरे मी पहिले
दाबल्याने दुर्बलांचा थांबतो अक्रोश का?
आग डोळे ओकणारे चेहरे मी पहिले
बाळ गेला दूर देशी एकटे माता पिता
दुःख हृदयी झेलणारे चेहरे मी पाहिले
तुज हवा "निशिकान्त" पंखा चार गजला खरडण्या
घाम अश्रू गाळणारे चेहरे मी पहिले
निशिकांत देशपांडे मो. न. 98907 99023
e mail दुवा क्र. १
प्रतिसादाची अपेक्षा