गोष्ट बाबुरावची ---

त्यानिमित्ताने त्याच्या चकरा परत प्लॉटवर सुरू झाल्या. त्या काळात त्याच्या घरात काहीतरी गृहकलह सुरू झाला असावा, पण त्याची कल्पना आम्हाला येणे शक्य नव्हते. पण घराचे बांधकाम चालू असताना त्याची पत्नी मात्र कधीच प्लॉटवर फिरकली नाही हे मात्र खरे. खरे तर याबाबतीत बाबुरावपेक्षा तिनेच अधिक उत्साह दाखवायला हवा होता कारण आता हे तिचे स्वतंत्र घर होणार होते.

. बाबुरावने मात्र यावेळी घराच्या बांधकामात विशेष लक्ष घातले होते आणि बऱ्याच झपाट्याने घराचे काम सुरू ठेवले होते. अर्थिक परिस्थिती बरी असल्याने आमच्यासारखे हप्त्याहप्त्याने घर न बांधता त्याने सुरवातीपासूनच बेसमेंट व त्यावर पाच सहा खोल्यांचे प्रशस्त घर बांधायला घेतले होते. आमच्या घराला अगदी लागूनच असल्याने मधूनमधून आमची त्याच्या बांधकामाकडे चक्कर असायचीच व त्या भेटीत त्याच्या बांधकामाची प्रगती पाहून आपल्या घराच्या बांधकामात मी केलेल्या काटकसरीवर मला सौ. चे ताशेरे ऐकावे लागायचे. बाबुरावने सगळे साहित्य अगदी उत्तम प्रतीचे वापरले होते. पुढून ऐंशी फुटी रस्ता जात असल्याने पुढील भागाला त्याच्या मते डौलदार कमानींची नक्षी केलेली होती. तो भाग सज्जासारखा पुढे आणलेला होता, त्या घरात रहायला आल्यावर त्यावर बसून आपण बुद्धिबळ खेळू अशी मनोराज्ये तो माझ्यासमोर रंगवीत असे. मलाही त्याच्या तेथे येऊन राहण्याची उत्कंठा लागलीच होती.

महाविद्यालयात एकाच विभागात काम करत असल्याने आमची बहुतांशी दररोज गाठ पडतच असे त्यामुळे तो प्लॉटवर आल्यावर परत मुद्दाम आमच्याकडे येण्याचे त्याला काही कारण नसे. कधी त्याच्या बरोबर आलेल्या त्याच्या छोकऱ्यास तहान लागली तर तो माझ्याकडे येऊन पाणी पिऊन लगेच परत जात असे आणि मलाही कॉलेजला जायचे वेध लागलेले असले तर मी तेवढ्यावरच त्याची बोळवण करीत असे.

त्यादिवशी इलेक्ट्रिक साहित्य घेऊन तो प्लॉटवर आला आणि दुसऱ्या दिवशीपासून इलेक्ट्रिक फिटिंग्स करायची आहेत असे सांगून कसेकसे पॉइंटस घ्यावेत याविषयी माझ्याशी चर्चा करण्यासाठी आपल्या बांधकामावर तो मला घेऊन गेला. माझ्या अनुभवानुसार मला आवश्यक ते मागदर्शन मी केले आणि तो घरी निघाला. रविवार सुट्टीचाच दिवस असल्याने मी त्याला म्हणालो

" चल, चहा घेऊया तू अलिकडे इकडे येऊन जातोस पण माझ्या घरी फिरकतच नाहीस. "

" तस काही नाही पण मूडच नसतो हे मात्र खर "

" काय झालय काय तुला बाबुराव अलिकडे कॉलेजमध्येही तुमचा दोघाचाच वेगळा सवतासुभा असतो. " मी त्याला बोलत करण्याचा प्रयत्न केला. अलिकडे त्या तिघाजणांचाच ग्रुप असायचा. ते तिघेही सिगेरेटचे शौकीन होते त्यामुळे आम्ही त्यांना थ्री मस्केटिअर्स म्हणत असू. आणि आता त्यातल्याच एकाची बदली झाल्यामुळे बाबुराव आणि त्याचा जोडिदार पानाचा शौकीन रावते अशा दोघांचाच संचार कॉलेज ते तारा पान हाउस असा चालत असे.

" तस काही नाही आपल काय त्याच्याशीच जमत जरा, त्यात तुम्ही हायर क्लासवाले आम्ही आपले फर्स्ट इयरवाले "

ते तिघही वरच्या वर्गाला शिकवत नसत.

" पण ते जाऊदे सध्या तू मूडमध्ये नसतोस हे खरे ना. "

"अरे, काहीतरीच काय तुझा गैरसमज झालेला दिसतोय. पण जाऊदे चहाचा आग्रह नको करू. आजचा चहा राखून ठेव "

असे म्हणून स्कूटरला किक मारून तो निघाला. त्याच्याबरोबर चहा प्यायचे माझ्या नशिबात नव्हते. कारण दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी पहिला तास होता म्हणून मी घाईघाईने महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारातून आत शिरतो तो पोर्चमध्येच सगळे प्राध्यापक जमलेले. मला पाहताच रावते पुढे आला आणि म्हणाला,

"काय केले हे या बाबुरावने आणि कशासाठी? "

मला काहीच कळेना हा असे काय म्हणतो ते. पण रावतेने मला ओढत पुढे नेले आणि पाहतो तो काय पोर्चमध्येच एका सोफ्यावर कोणीतरी पहुडले होते असे मला वाटले पण प्रत्यक्षात तो बाबुरावचा मृत देह होता. काल संध्याकाळी चहा प्यायला येण्याचे आश्वासन देऊन बाबुराव कायमचाच निघून गेला होता आणि तोही काही अचानक मृत्यूने त्याच्यावर घाला घातला म्हणून नाही तर काल रात्रीच बाबुराव औरंगाबाद स्टेशनवर जाऊन बसला होता आणि रात्रीच्या एलोरा एक्प्रेसपुढे उडी ठोकून त्याने स्वत; आपली इहलोकची यात्रा संपवली होती. स्टेशनवर गेलेल्या लोकांनी सांगितले की त्याच्या शरीराचे तुकए तुकडे गोळा करून आणावे लागले होता इतका त्याचा देह गाडीखाली चोळामोळा होऊन गेला होता.

काल माझ्याशी बोलताना तर तो अगदी नेहमीसारखाच वागला. मग त्यावेळी त्याच्या मनात असे होते का? त्याचा मुलगा त्याचा फारच लाडका होता आणि त्याच्या शेजाऱ्यांकडून कळले की त्याच्यासाठी खेळणी आणण्यासाठी तो बाहेर पडला होता आणि तसाच स्टेशनवर जाऊन बसला होता. त्यावेळी मालगाडी नेहमी स्टेशनवर येते हे त्याला माहीत होते आणि तिच्याखालीच जीव देण्याचा त्याचा विचार असावा पण मालगाडी त्यादिवशी आलीच नाही तरीही तो उशीरा येणाऱ्या एलोरा एक्स्प्रेससाठी थांबला म्हणजे त्याचा ठाम निर्धार झालाच होता. असे काय घडले होते की इतक्या वरवरतरी आनंदी वाटणाऱ्या प्राण्याला जीव संपवावा वाटला. कधीच आमच्यापुढे आपले मन मोकळे करावे असे त्याला का वाटले नाही? पण आता या कुठल्याच प्रश्नांची उत्तरे मिळणार नव्हती.


(गोष्ट
बाबुरावची हा एक अनुभव आहे. कथा नव्हे. कथेचा शेवट करण्याचे स्वातंत्र्य
लेखकाला असते पण येथे तसे नव्हते. त्यामुळे याचा शेवट अगदीच अनपेक्षित झाला
आणि तसा का झाला हे अजुनही कोणी सांगू शकत नाही.
)