अपुरी कविता

आज पहिल्यांदाच उमगली मृगजळामागे धावण्याची व्यथा,

वाट सरत आली तरी, सरली नाही वेदनांची गाथा.

लागू नये वैऱ्यालाही अशी ठेच जीवघेणी,

आसवांना पिऊन घेतात, वाऱ्यावरची विराण गाणी.

सुन्नपणाच उरतो फक्त, जाणीवांचा पक्षी उडून जातो,

रात्री तर काळ्याच असतात, भरदिवसाही अंधार होतो.

स्वप्नांची शकले कोसळत असतात, सामर्थ्य असते फार अपुरे,

शब्दांच्या पैल व्यथा असते, खुजी होतात सारी गोपुरे.

लेखणी मुकी, वाचा नि:शब्द, स्वतःचीच स्वतःला शिक्षा

आता उरली केवळ प्रतीक्षा, फक्त प्रतीक्षा आणि प्रतीक्षा.

दैवानेच पाठ फिरविली, शब्दांनी थांबावे कुणाकरिता?

अनंताच्या अनंतापर्यंत तरी, होईल का पूर्ण ही अपुरी कविता?