तुझ्या निष्ठेवरी भाळून हा निर्णय नवा मी देत आहे
तुला वाट्टेल तेव्हा यायची दुःखा, मुभा मी देत आहे
जरा संधी मिळाली की इथे चौखूर भरकटतो म्हणूनच
तुझ्या हातात माझ्या जिंदगीचा कासरा मी देत आहे
सदा 'खाऊन' ढेकर द्यायची बंदीच पाळावी मनाने
अशासाठीच त्याला मोजका आता शिधा मी देत आहे
कधीपासून आहे चाललो मी, लक्षही नाही कुणाचे
उगा का वाटले दुनियेस अकरावी दिशा मी देत आहे?
नशीबाची मला पर्वा नसे हे का तिला ठाऊक नाही?
जिचा होऊन दैवाला इशारा हा खुला मी देत आहे
तुझे सारेच नाही जात वाया राबणे माझ्याबरोबर
चिमुटभरसा तरी माझा तुला 'कणखर'पणा मी देत आहे
------------------------------------------
विजय दिनकर पाटील 'कणखर'