जमते तुला कसे गं?

एकांतवास जगणे जमते तुला कसे गं?
कोषात बंद झुरणे जमते तुला कसे गं?

बोलावता तुला मी, लाजून दूर जाशी
स्वप्नी नजीक असणे जमते तुला कसे गं?

चाहूल लागता तव उघडून दार बघतो
मृगजळ बनून दिसणे जमते तुला कसे गं?

केले वजा तुला जर आयुष्य शुन्य माझे
शुन्यात शुन्य बघणे जमते तुला कसे गं?

पहिल्याच कटाक्षाने घायाळ जाहलो मी
तडफड बघून हसणे जमते तुला कसे गं?

म्हणतात प्रेम वाहे सरिते समान वेगे
थोपून भाव धरणे जमते तुला कसे गं?

बालिश मला म्हणूनी परिपक्व भाव दावी
वेळे अधीच पिकणे जमते तुला क्से गं?

तुज ठेच लागता मी कण्हलोय आर्ततेने
मम वेदना विसरणे जमते तुला कसे गं?

यात्रेत शेवटीच्या डोळे हजार ओले
लपवून नेत्र पुसणे जमते तुला कसे गं?

झाडा वरील घरटे होते जरूर अपुले
सोडून त्यास उडणे जमते तुला कसे गं?

श्रींमंत हात धरला "निशिकांत" पूस तिजला
हर्रास होत विकणे जमते तुला कसे गं?