जीवनाच्या या वाटेवर होतो पावलोपावली परिस्थितीशी सामना,
नेहमी यश आणि विजय मिळो हिच असते आपली कामना...
जीवनाची रंगीत स्वप्ने पाहत केलेला असतो अभ्यास,
उत्तम मार्क मिळवून भरमसाठ पगाराचाच असतो मनी ध्यास..
कधी कधी दुर्दैवाने केलेले प्रयत्न होत नाहीत सार्थ,
मग वाटू लागते मनी हे जीवनच मुळी व्यर्थ..
पण क्षणैक थांब नैराश्याचा तो फास गळी आवळताना,
एक अपयशच शेवट असता तर दिसला असता का सचिन कधी खेळताना...
छोट्याश्या गोष्टीवरून घरात कितीतरी भांडणे झाली,
कधी नव्हे ते आज आई माझ्यावर रागावली..
क्षुल्लक कुरबुरीचा मनस्ताप असो वा भांडणाचा राग,
क्षणात सोन्यासारख्या देहावर रॉकेल टाकून भडकते आग..
पाहा एकदाच भूतकाळात छोट्याश्या गैरसमजुतीसाठी असा निर्णय घेताना,
त्याच व्यक्तीसोबत घालवलेले सुखद क्षण दिसतील हसत हसत जाताना...
आयुष्याच्या एखाद्या वळणावर एक आगंतुक व्यक्ती जीवनात येते,
आपण तिच्या प्रेमात आकंठ बुडतो अन ती हलकेच निघून जाते..
'मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही' म्हणून विषाचा पेला हाती घेताना,
आपल्यावरही जीवापाड प्रेम करणारे आहेत हे का विसरतो ही आहुती देताना..
मान्य आहे कधीही भरत नाही आयुष्यात निर्माण झालेली पोकळी,
जन्मापासून तुझ्यावर प्रेम करणाऱ्या आई बाबांनी कशी भरावी जागा तुझी मोकळी...
एकाकीपणा, कर्ज, नकार, अपयश कारणं असतात कैक,
विषण्ण मनाला उपाय दिसतो आत्महत्येचाच एक..
पण लक्षात ठेव एक नेहमी या जीवनवाटेवर चालताना,
पळपुटेपणापेक्षा धीरोदात्तपणे उभा राहा संकटांशी लढताना..
आजची वेळ अवघड असली तरी मुकू नकोस तु उद्याच्या सोनेरी क्षणांना,
काळरात्रीचा सामना केल्याशिवाय कधीच अनुभवता येणार नाही त्या सूर्यकिरणांना...