दु:खं दु:खं म्हणजे नक्की काय असते
आतून रडणे आणि बाहेरून हसणे असते
बाहेरून हार्ड रॉक असले तरी
आतून इंडियन क्लासिकल असते
कोणाच्या आठवणींचे तर
कोणाच्या विरहाचे गीत असते
सुखाच्या कळीचे खुलणे असते
आयुष्याच्या तव्यावरचे छानसे थालपीठ असते
कोणाला आयुष्याचे उमगलेले कोडे असते
तर कोणाला सुखाच्या सुरवातीची चाहूल असते
सुखाच्या ओठावरचे तरळणारे गीत असते
आसवांच्या कुशीत झोपणारे गोड स्वप्न असते
वाटले तर यातना असते
भोगले तर स्वप्न असते
स्वीकारले तर प्रेम असते
मानले तर ४ दिवस असते
नाहीतर ७. ५ वर्षे असते
कोणाचे लग्ना आधी तर
कोणाचे लग्ना नंतर असते
कोणाचे कॉलेज मध्ये तर
कोणाचे नोकरीत असते
कितीही असले तरी दुसऱ्या पेक्षा
जास्त असते
आपले ते जास्त आणि
दुसऱ्याचे ते कमी असते
कधी आयुष्याचं वळण तर
कधी आयुष्याचा धडा असते
मिळालेच तर हसत भोगायचे असते
कारण सुखापेक्षा कधीही ते जवळचे असते
पहिल्यांदा येते तेव्हा केस असते
नंतर येते तेव्हा हॅबिट असते
गोड गुलाबाचे काटे असते
चिखलात उमललेले कमल असते
जाणीव जागे करणारे इंजेक्शन असते
विवेक जागृत करणारे मलम असते
सुखासारखे मृगजळ नसते
आयुष्यभर साथ देणारे वटवृक्ष असते
डोळ्यातील आसवे असते
हृदयातील काहूर असते
येणाऱ्या सुखाला टाळी द्यायला
मात्र ते हसत तयार असते
सांगितले तर जास्त असते
भोगले तर कमी असते
थरथरणाऱ्या हाताने
आणि हसऱ्या चेहऱ्याने
लिहिलेले काव्य असते.