जाणले कसे मनातले जहर
खोल खोल आतवर तुझी नजर
आठवात पाहता तुला कधी
शांत जीवनात माजतो कहर
ताळतंत्र सोडले तुझ्यामुळे
वाटतो जगास मीच वेडसर
जाहले चरित्र शील कालचे
आज सावरून नीट घे पदर
बोलण्या अधीच वाद आज, पण
गोड बोललो कधी प्रहर प्रहर
मारले मनास मी क्षणोक्षणी
जाहले बधीर दु:ख बेअसर
शोधपत्रकारिता अशी कशी ?
सांगते सवंग फालतू खबर
टाळ नाश सोड वाट वाकडी
सावधान ! ऐक जाहला गजर
जाहले लिलाव खूप, पण मला
शुन्य भाव, काय जाहली कदर !
बोज ना कुणास जाहलो कधी
खोदली मरायच्या अधी कबर
काय तीर मारले नथीतुनी ?
ज्यामुळे जगा पडू नये विसर
बोनसाय सारखी सजे ग़ज़ल
दागिना तिचा लहानसा बहर
निशिकिआंत देशपांडे मोंं. ; -- ९८९०७ ९९०२३
Email :- nishides1944@yahoo.com