ओळखपत्र

कोण तुम्ही...?
त्याने नाव सांगितले
नाव, जात , धर्म
जन्मदात्याने दिलेली ओळख
आता पुरत नाही
अधिकृत ओळख लागते
जुन्या ओळखीमुळे मिळालेला मान सन्मान
अवमान, अवहेलना सुद्धा
पचवून कोडग्यासारखा तो उभा
वर्षानुवर्ष....
तरीही त्याला ओळख विचारतात
त्याची आता एकच ओळख
       "वृ ... द्ध "

बिनकामाचा, समाजाला नकोसा
मुलांना अडचणीचा
पण अडचणीत उपयोगी पडणारा
    "नि मू ट प णे "
तरीही एकाकी....

"अकेला आया , अकेला जायेगा "
हे खरं असलं तरी
सोबतीची गरज असलेला
म्हणतील तेव्हा वृद्धाश्रमाची
वाट धरणारा......
वारस असून बेवारशी ठरलेला
अगदी "एकटा वृद्ध  "

या सगळ्या ओळखी
कामाच्या नाहीत
कार्डावर यातली ओळख
लिहीत नाहीत
कोरडेपणानं लिहितात
नाव, पत्ता, वय, एवढेच
भावनाना स्थान नाही
जणू सभोवतालच्या अचेतन सृष्टीचा
   "एक घटक " ....

ही तर त्याची ओळख नाही ?

यम ओळखपत्र मागत नाही
तो ओळखतो
फक्त अशरीरी आत्म्याला
कारण यमही अशरीरीच......