फसवणूक

डोक्यावर गांधी टोपी चढवत भ्रष्टाचार विरोधात  मोठ मोठ्यानेओरडणारा मी
उपाशी अण्णा राम लीला मैदानावर दोन्ही वेळेला आडवे हात मारत जेवणारा  मी

सारा देश पेटला आणि अण्णांच्या माघे लोटला उघड्या डोळ्यांनी पाहणारा मी
ऊन पाऊसात घोषणा ते देत होते घरात बसून ढिम्म बसत खुर्चीत पाहणारा मी

देशातला भ्रष्टाचार संपलाच पाहिजे चौकात घोषणा देत ओरडत फिरणारा मी
हातात एक थंड बिसलरी घेत अण्णांच उपोषण गार घोटाने अनुभवणारा मी

काय त्या वृद्धाची ताकद  शेलार मामाशी बरोबरी करत चघळत सगळ्यांना सांगणारा मी
जिंकली लढाई एकदाची अण्णांनी भ्रष्टाचाराची म्हणत शित पेय चवीने रीचवणारा  मी

सहजच म्हणून मला प्रश्न पडला खरच भ्रष्टाचार विरोधात लढणारा मी
की एखादे लायसन्स लवकर मिळावे म्हणून १०० ची नोट हळुच काढणारा मी

ह्या देशात खरच पुन्हा एकदा जनता सुखी व्हावी अस ठासून सांगणारा मी
शिवाजी जन्माला यावा पण शेजारच्याच्या घरात रास्त अपेक्षा? हि बाळगणारा मी

काय जग आलय माणसच माणसाला फसवताय म्हणत गळा काढणारा मी
भ्रष्टाचार मुळापासून संपला पाहिजे म्हणत स्वतःच स्वतःला फसवणारा मी