हळू वाद घाला

         
फुलांनो हवेशी हळू वाद घाला
हवा पोंचवी गंध तुमचा जगाला

जरी फूल निर्माल्य होते तरी का
कळ्या हट्ट करतात उमलावयाला

कशाला भुलावे वृथा मृगजळाला?
करू यत्न मिळवावया शाश्वताला

जरा दु:ख लपवायलाही शिकावे
जगा हास्य देऊन फुलवावयाला

नको आज ओठी तुझे गोड गाणे
उद्या तेच लागेल काचावयाला

नव्याने जगू या करू श्रीगणेशा
जुने घाव आघात विसरावयाला

जुन्या प्रेमपत्रास वाचून भिजलो
कढीला शिळ्या का अता ऊत आला

मला जीवनाची नशा एवढी की
यमाला सुचवले उद्या यावयाला

खरे प्रेम "निशिकांत" त्यागात असते
नसे ते तराजूत तोलावयाला

निशिकांत देशपांडे.  मो.क्र. ९८९०७ ९९०२३