ओढाळ या मनाला काबूत का करावे?
जैसे मनास वाटे तैसे न का जगावे?
फुलपाखराप्रमाणे मन सैरभैर फिरते
रूढी परंपरांना जखडून का असावे?
पार्यात घोळले तू माझ्या मनास देवा
म्हणतोस लक्षमणाच्या रेषेत वावरावे
मिळतोय खूप चारा पण चित्त शांत नाही
एकाच दावणीला मीही किती झुलावे
या संथ जीवनाला नवखी दिशा मिळावी
श्वासात बेरकेपण, वादळ जरा भरावे
केले कधीच नाही मी पाप, आज माझ्या
अवखळ मनास वाटे थोडे गुन्हे करावे
वाटे मनास जेजे स्वप्नात सर्व दिसते
स्वप्नात जे आहे ते का जीवनी नसावे?
ही गोड बंडखोरी सुचवी मला मनाची
दाऊन वाकुल्या मी थोडे जगा हसावे
काबूत मन असावे शिकवण जुनी पुरानी
इरसाल या मनाला कवळून जोजवावे
निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३