श्रीमंत भाग तीन

"ए आई, अग ही फडकी उचल ना फरशी पुसायची. दोन तीन दिवस तसंच पडलंय ते गाठवड. आणि ते पण बेड जवळ कशाला ठेवलंय, मोरीत जाऊ देत त्यांना .." घरी मित्र यायचे म्हणून मी आवारा आवरी करत होतो. 
ज्या वस्तू माझ्या नाहीत अश्या वस्तूंचा पसारा आईनं उचलावा म्हणून उगाचच तिच्यावर फर्मान सोडत होतो.
दुसऱ्याच दिवशी ती फडकी तिथून गायब होती ते माझ्या लक्षात आलं. मी संध्याकाळी जेवताना विषय काढला.
"आई ते फडक्यांच्या बोचक्याचं काय झालं गं ? कुठे गायब केलीस इतकी फडकी ?" मी आई ला विचारलं.
त्यावर आई जरा भडकली. आणि तिनी बोलायला सुरुवात केली.. 
"ती काय फडकी नव्हती.. अरे नाना आजोबांचे कपडे होते ते.. चित्रा* ला धुवायला सांगितले होते त्यांनी. पण तुला माहितीये की नाना कुठे कुठे हिंडतात, काय काय खातात बाहेर, आणि सांडतात कपड्यांवर. 
नीट लक्ष देत नाहीत. मग ते डाग तसेच राहतात आणि जात नाहीत कितीही स्वच्छ धुतले तरी.. 
नाही म्हटलं तरी चित्रा च पण आता वय झालंय. नाही होत पाहिल्यासारखं आता तिला. म्हणून मग ते कपडे भट्टी ला द्यायचे म्हणून ती इथे घेऊन आली.
आणि त्या कपड्यांना तू फरशी पुसायची फडकी म्हणत होतास.."
"अग सांगतेस काय आई, नानांकडे कपडे नाहीयेत का दुसरे चांगले ? मी जाऊन नवीन कपडे घेऊन येतो उद्याच"
"अरे चिक्कार आहेत. पण घालतच नाहीत. परवा आलेले ते इथे. त्यांनी ते गाठवड पाहिलं कपड्यांचं, आणि तडतडा घरी निघून गेले. घरी जाऊन चित्रा आणि आईवर खूप ओरडा आरडा केला. चित्राला तर मारायलाच निघाले होते."
"चित्रा  बाळे बाळे** करत धावत आली इकडे. आधी घरी चल. नाना आई ला आणि मला मारायला निघालेत असं म्हणत होती."
"अग पण इतकं काय झालं ? त्या दोघींना कशाला मारायला निघालेत ते .." मी मध्येच तोडत आईला विचारलं.
"ते कपडे बाळीकडे का दिले धुवायला ? ... ह्याच कारणावरून.. चित्रा म्हणतीये त्यांना की बाळीला  धुवायला नाही दिले, भट्टीला द्यायचे म्हणून घेऊन गेले होते. पण दुकान बंद होतं म्हणून बाळीकडेच ठेवले.. 
पण ते ऐकतायत कुठे.. नुसता हाहाकार केला काल घरी त्यांनी.. "
"नाना आजोबा पण ना .. थांब मी जाऊन भेटतो त्यांना. बोलतो नीट त्यांच्याशी.. "
"राहू दे रे. . मी जाऊन आले लगेचच. मी बरीच बोलले त्यांना. म्हणाले त्यांना .. 
की तुमचे शाखेतले इतर मित्र पण असेच येतात का घाणेरड्या कपड्यात ? भूषण चे आजोबा म्हणून सांगता ना सगळीकडे? मग काय म्हणतील लोक ?
भूषण लक्ष देतो की नाही तुमच्याकडे असं विचारतील. बरं, आणि कपडे नाहीयेत असंही नाही. कित्ती विजारी आणि झब्बे नुसते घड्या घालून ठेवलेत पेटीत. मग हेच घाणेरडे कपडे कशाला घालायचेत तुम्हाला?"
आईनं  मला मध्ये आणून नानांच्या अगदी वीक पॉंईंट वरच वार केला होता.
मी "बर" म्हणालो आणि विषय सोडून दिला. 'old habits die hard' असाच काहीतरी होतं हे..
इतके वर्ष काटकसर करून जगत आलेलं आयुष्य आणि सध्याचं 'किंचित' चैनीच आयुष्य.. दोन्हीमध्ये त्यांच्यासाठी 'बऱ्यापैकी' फरक होता. त्याचाच हा एक परिणाम होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी नाना आले. "बाळे, मला आणि भूषण ला चहा टाक गं."
मी अंघोळ करून बाहेर आलो. समोर नाना पेपर चाळत बसले होते. अंगावर नवीन कपडे घातले होते. मी आई कडे एक नजर टाकली. 
दोघांनीही एकमेकांना एक मस्त समाधानकारक 'स्माईल' दिली आणि आम्ही तिघांनी गरम चहा चा घोट घेतला. 
------ 
*आमच्या आईला माहेरचे सगळे 'बाळी' म्हणूनच हाक मारतात
**माझी धाकटी मावशी जी आजी आजोबांसोबत राहते.