श्रीमंत भाग दोन

१९२४ सालचा नानांचा जन्म. तरुणपणापासून ते आजपर्यंत संघाच्या शाखेत जायची
सवय लावून घेतलेली. दोन वेळा संघासाठी तुरुंगात पण दिवस काढलेले.कोणत्याही
प्रकारचे व्यसन नाही की तोंडात कधी अपशब्द नाही. ताटात वाढलेलं सगळं
संपवणे, ताठ बसणे अश्या चांगल्या सवयी जन्मभरासाठीच अंगी लागलेल्या. त्या
काळात कऱ्हाड मध्ये कोणी त्यांना ओळखत नसेल तरच नवल.
एका छापखान्यात
नोकरी धरलेली आणि "त्या वेळच्या" दीडशे रुपयांत चार मुली, आणि मुलगा आणि
बायको असं छोटंसं कुटुंब पोसलेलं. प्रचंड स्वाभिमानी आणि कडक पण तितकाच
भोळा स्वभाव. आयुष्यात अनेकांनी आर्थिकदृष्ट्या फसवणूक केलेली. तरीपण
असल्या पडझडींना ठामपणे तोंड देत खंबीरपणे उभे. सर्व मुलांना शिकवलं, मोठं
केलं.
आज त्याचं वय ८७. दुर्दैवानं आयुष्याच्या संध्याकाळी पण त्यांना अतोनात हाल सोसावे लागत आहेत.
काही वर्षांपूर्वी आजारपणामुळे त्यांना पुण्यात मामाकडे आणण्यात आलं.
काही
दिवसांनी त्यांच्या राहिलेल्या वस्तू आणण्यासाठी कऱ्हाडला जायचा मला योग
आला.जीर्ण झालेल्या त्या दुर्लक्षित घरात मला दोन तीन ठिकाणी काही पिशव्या
सापडल्या. त्यात हजारो रुपये सापडले. वाईट म्हणजे सर्वच्या सर्व नोटा वाळवी
नी खाल्लेल्या. त्या पैशांचा आता काहीच
उपयोग नव्हता. त्यांच्या
आयुष्यभराची कमाई अशी वाया गेली. ही परिस्थिती नानांनी पहिली असती तर काय
वेळ आली असती त्यांच्यावर ह्याचं विचार पण करवत नाही.

त्याच काळात
मामानं कऱ्हाड चे घर विकून बरेचसे पैसे स्वतः:च्या पोटात घातले. त्यावरून
प्रचंड वादावादी ताणतणाव झाले. नानांना बिपी चा त्रास तेव्हा सुरू झाला.
मुलगा आणि सून ह्यांच्या वागणुकीला कंटाळून हा माणूस आनंद नगर वरून आमच्या
इथे भर उन्हात चालत आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मावशी आणि आजी पण आल्या.
धाकट्या मावशीच्या डोक्यात लहानपणी ताप गेला होता. ताप गेला पण आजी
आजोबांसाठी मात्र तो जन्माचा ताप होऊन बसला. मधली मावशी तिच्या बाळंतपणातच
देवाघरी गेली. मोठी मावशी गुजरातला असल्याने ह्या तिघांना सांभाळायला
तीनिसुधा नकळतच आपले हात वर केले होते.
त्यामुळे ही एक अनपेक्षित जबाबदारी आमच्यावर, खासकरून आईवर येऊन पडली होती. पण तिनी  ती आनंदाने स्वीकारली.
"ते माझे आई-वडील आहेत, त्यांना मी सांभाळणार" असं ती त्या वेळेस ह्या सगळ्या पळवाटा काढणाऱ्या लोकांना म्हणाली होती.

आमच्या
दोन अतिशय लहान आकाराच्या भाड्याच्या खोल्या. पाणी बाहेरून भरावे लागते,
संडास सार्वजनिक. त्यातून हे तिघे आमच्या घरी राहणं हे घरमालकांना काही
विशेष आवडलं नव्हतं. पाणी भरताना त्रास देणे वगैरे अश्या कृत्यातून त्यांचा
रोष दिसून यायचा.
साधारण वर्षभर ते आमच्या इथे होते. देवाच्या कृपेनं एक छोटी खोली मागच्या गल्लीत मिळाली आणि हे तिघे तिकडे तिकडे राहू लागले.
नानांची ओळख प्रभात शाखेच्या कार्यकर्त्यांशी करून दिली आणि काही दिवसातच नानांचा दिनक्रम सेट झाला.
रोज
सकाळी प्रभात शाखेत नियमित जाणे, हिंडणे फिरणे अशात त्यांचा वेळ चांगला
जाऊ लागला. बरंच मित्रावळ पण झालं. सर्व काही सुरळीत चालू होतं.
असा हा
श्रीमंत माणूस ५-६ दिवसांपूर्वी आजारी पडला. बाहेरचं काही खाऊ नका, असं
त्यांना अनेकवेळा बजावूनपण त्यांनी कोणाकडेतरी साबुदाण्याची खिचडी खाल्ली.
त्याचंच निमित्त झालं. सांगितलेलं ऐकत नाही त्यामुळे त्यांच्याबद्दल माझ्या
मनात थोडासा राग बसला. पण मनाशी म्हणलं, "म्हातारपण" म्हणजे हेच असावं.
त्यांना लगेचच दवाखान्यात भरती केलं. पहिले २-३ दिवस परिस्थिती जरा बेताचीच वाटत होती. काय होईल काही सांगता येत नव्हतं.
अश्या
जवळच्या व्यक्तीच्या आजारपणाची आणि त्यांची परिस्थिती बघता स्वाभाविकपणे
त्यामागून येणाऱ्या भीतीचा सामना करायची माझी पहिलीच वेळ होती.
खरंतर
नानांना शारीरिक त्रासापेक्षा मानसिक त्रास च जास्ती होत होता.
लहानपणापासूनच एकुलता एक म्हणून लाडावलेला त्यांचा मुलगा असं करेल असा
विचार पण त्यांच्या मनाला शिवला नसेल.लाडक्या मुलापासून लांब राहण्याच्या
ह्या विरहामुळेच त्यांना जास्ती त्रास होत होता. त्यातून मामानं
त्यांच्याशी कायमचा संबंध तोडला. जेव्हापासून ते घरातून निघून गेले
त्यानंतर मामानं परत कधीच तोंड दाखवलं नाही. जसं काही त्याला तेच हवं होतं.

दर
गुरुवारप्रमाणेच त्या दिवशीपण मी स्वामींना गेलो. हात जोडून स्वामींना एकच
मागणं मागितलं. "नानांना मोकळे करा स्वामी. मोकळे करा त्यांना."
पण
त्याच वेळेस काय झालं कोणास ठाऊक. एरवी डोळे उघडे ठेवून, स्वामीच्या
मूर्तीच्या डोळ्यात पाहून प्रार्थना करणारा मी. पण त्या क्षणाला माझे डोळे
आपोआपच मिटले गेले. आश्चर्य म्हणजे साक्षात स्वामी माझ्यासमोर उभे होते. ते
माझ्याशी थोड्या वरच्या आवाजातच म्हणाले "अरे, त्यांना मोकळे करा असं
मागतोस मला? त्यांना लवकर बरे करा असं का नाही मागत माझ्याकडे?" इतकं
म्हणून स्वामी अदृश्य झाले.
मी डोळे उघडले. मुर्तीरूप स्वामी समोर उभे होते. त्यांच्या डोळ्यात पाहून मी मनापसून क्षमा मागितली. आपण काय चुकत होतो ते मला
उमगलं
होतं. मी परत प्रार्थना केली. "त्यांना लवकर बरे करा स्वामी. त्यांची
जबाबदारी पेलण्याची शक्ती माझ्या हातांना द्या. त्यांचा सांभाळ करण्याची
संधी मला द्या..".

संध्याकाळी दवाखान्यात जाऊन नानांना भेटलो. नाना
एकदम बरे वाटत होते. "मी एकदम बरा आहे, मला आता लवकर सोडा" असं म्हणत
होते.  सकाळी नानांच्या काही टेस्ट करण्यात आलेल्या. त्यात टीबी चि पण
टेस्ट घेण्यात आलेली. त्याचे रिपोर्ट आले होते.
त्याच संदर्भात
डॉक्टरांना भेटलो. डॉक्टर म्हणाले सर्व काही नॉर्मल आहे. आणि आज ते एकदम
बरे आहेत. फक्त खबरदारी म्हणून त्यांना अजून २ दिवस दवाखान्यातच ठेवू.
मनामध्ये देवाचे खूप खूप आभार मानले. आणि ह्या श्रीमंतास लवकरात लवकर ठणठणीत बरं करून घरी येऊ दे अशी प्रार्थना केली.