श्रीमंत

निवृत्ती उर्फ नाना धोपाटे, माझ्या आईचे वडील - माझे आजोबा.
नाना म्हणजे एक कणखर व्यक्तिमत्त्व. सर्व आयुष्य कराड या शहरात घालवलेलं. अतिशय कष्ट करून मिळेल त्या पैश्यांमध्ये आयुष्य काढलेलं.
४ मुली आणि १ मुलगा अस बरंच मोठं कुटुंब. तुटपुंज्या पैश्यांमध्ये, अतिशय काटकसर करून मुलाला आणि २ मुलींना शिकवून घडवलं.
देशासाठी, रा. स्व. संघासाठी स्वातंत्र्यकाळात अनेक वेळेस तुरुंगवास सुद्धा त्यांनी भोगला आहे.
 स्वभाव अतिशय प्रामाणिक आणि भोळा. तिच शिकवण त्यांच्या मुलांना आणि मुलांकडून आम्हा नातवान्ना  मिळाली . अगदी साध्या साध्या गोष्टी पण काटेकोरपणे पाळणार. जेवताना ताटामधील सर्व अन्न संपवणे,  बसताना ताठ बसणे अशा अनेक चांगल्या सवयी जन्माच्याच  अंगवळणी  पडलेल्या.
वयाच्या ८८ व्या वर्षी सुद्धा नाना ह्या गोष्टी अगदी सहजपणे करतात.
पण ह्या व्यक्तीचं दुर्दैव बघा ना ..
वयाच्या ८१ व्या वर्षी कराडवरून पुण्यात मामा कडे आणण्यात आलं आणि ह्या नानांच आयुष्यच बदललं. सुनेशी पटत नसल्यानं हा माणूस केवळ स्वाभिमानापायी घराबाहेर पडला. नाना आनंद नगर पासून मंडई मध्ये - आमच्याकडे - पायी चालत आले. दुसर्याच दिवशी आजी पण निघून आली.
मामानं कराडच्या घराचा गैरव्यवहार करून बरेच पैसे पोटात घातले. घरदार नसलेले असे हे आमच्याकडे जवळ जवळ वर्षभर होते. आमच्च घर भाड्याच असल्यानं  त्यांना जास्त दिवस ठेवायला मालकांनी परवानगी दिली नाही.
देवाच्या कृपेने मागच्याच गल्लीत एक छोटीशी खोली मिळाली. त्यांना तिथे शिफ्ट केलं. तिथे ते आनंदाने राहू लागले. त्यांचा बराचसा खर्च आईच बघायची.
------------------------------------- 
परवाच माझं शिक्षण पूर्ण झालं म्हणून आणि चांगली नोकरी लागली म्हणून पेढे द्यायला गेलेलो. त्यांच्यात आणि माझ्यात झालेला बोलणं मी खाली आहे त्या शब्दात मांडतोय ..

नाना : ये ये , वेड्या ये ... चित्रे, चहा टाक गं, वेडा आलाय.
मी     : अहो नको आजोबा, मी आत्ताच चहा घेऊन आलोय. हे घा, पेढा घ्या आधी.
नाना : अरे वेड्या कसला पेढा हा ?
मी : अहो, पहिला आलोय कॉलेज मध्ये . हे घ्या.
हे ऐकूनच त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. आजी नि कौतुकानं माझी पाठ थोपटली आणि एका हातात पदर घेऊन तिनी स्वतःचे डोळे पुसले.
नाना : आनंद झाला . आता एक छान घर घेऊन टाक बरं.
मी : हो, आता घर घ्यायचं. अजून दोन वर्ष तरी लागतील बघा आजोबा.
नाना : दोन वर्ष ? तू आत्ता राहतोय तेच घर का नाही घेत विकत?
मी : हो, तेच घर घ्याचय आजोबा. पण त्याला भरपूर पैसे लागतील की. पैसे साठायला जरा वेळ लागेल.
नाना :  वेळ कशाला लागतोय? मी देतो की पैसे .. किती पाहिजेत बोल ..
क्षणभर  शांतता पसरली. आणि दुसऱ्या क्षणाला त्या "गर्भश्रीमंत" पुरुषाच्या लक्षात आलं की, आपल्या नातवाला द्यायला आपल्याकडे एक पैसा पण नाही. उलट तोच आपल्याला जे पैसे देतो, त्यातूनच आपला तोडका मोडका सन्सार चालू आहे.
आपण आता पस्तिशी मधले तरुण नसून ८८ वर्षाचे झालेलो आहोत आणि आपल्याकडे जे काही होत, ते सगळं काळानं आपल्याकडून हिसकावून घेतलं आहे.
आणि नानांच्या डोळ्यांमधून अश्रूंच्या धारा लागल्या.
हे पाहून,  मी माझी शबनम उचलली आणि अश्रूंना आवर घालतच घरचा रस्ता पकडला.
रस्त्यावरून जाताना  हातात चितळ्यांची पेढ्याची पिशवी आणि डोळ्यात मात्र अश्रूंच्या धारा लागलेल्या अशा मला बघून अनेक जण कोड्यात पडले.
पण त्या दिवशी मी एक गोष्ट मात्र मनाशी ठरवली ..
श्रीमंत व्हायचं तर फक्त पैश्यानं नव्हे तर ह्या माणसासारखं "मनानी" सुद्धा.