ताई म्हणजेच माझी आई

ताई, तू दिसतेस सर्वत्र

आई, तू असतेस सर्वत्र
मी आलो की , 
तुझे लगबगीने पाणी आणून देणे
तुला त्रास नको म्हणून
माझे नको म्हणणे
आणि तुझ्या डोळ्यात पाणी येणे
मी आलो की ,
काहीतरी खायला देणे
मी आनंदाने खाल्ले तर
कौतुकाने परत वाढणे
आणि खोल डोळ्यात 
टचकन पाणी येणे
       ते खोल गंभीर नेत्र
.... आई तू दिसतेस सर्वत्र
माझे जगाशी फटकळ वागणे
तुलाच फक्त जाणवत होते
माझे कळवळणे
तुझे मला नित्य सांगणे
"रागावू नको"
तुला माहीत होते 
मी मार्ग सोडले होते
खुप त्रास सोसून, नवे शोधले होते
माझे कष्ट बघून ,
पापण्यांना ओल येणे
तु सांगत होतीस
      नाहीत रे कामाचे हे वायफळ मित्र
.... आई तूच असतेस सर्वत्र
माझा खडबडीत पण हळवा स्वभाव
तुलाच फक्त लागे ठाव
स्वतःच सुकाणू सावरतेस
माझी भरकटलेली नौका
तुफानाशी लढत तीरावर आणतेस
मागचे सारे विसरून
तुझे ते मार्ग क्रमणे
वाया गेलेल्यांना सावरणे
समाजसेवेत आनंद मानणे
निवडुंगाला आणि तुळशीला
तेव्हढ्याच प्रेमाने पाणी घालणे
      सारलीस मिट्ट रात्र
.... आई तू दिसतेस सर्वत्र
.... ताई तू असतेस सर्वत्र
*आई, ताई, मावशीस