आम्ही चालवू हा पुढे वारसा
तेजोमय पावन स्त्री शक्तिचा वसा ॥ध्रू ॥
यमामागून सावित्री पतिसंगे गेली
जावून पतिप्राण जिंकून आली
वनवासी सीता रामासवे जावुनी
घडविले लवकुशास महाशक्तिशाली
त्या त्या युगात उमटवून गेल्या अपुल्या पाउलांचा ठसा ॥ १॥
पांचाली द्युतात पणास गेली
परी नाही संकटाना डगमगली
शत कौरवाना पुरून उरली
जगी पतिव्रता गौरवली गेली
जाळूनी विकृत पौरुश वासनान्ना शिकविला धडा समाजाला जसा ॥२॥
आम्हिही सख्या झाशिच्या राणीच्या
वावरतो लढतो विविध क्षेत्री आमुच्या
वंदून तिला शपथ घेवू आज
काळिमा न लागो नावाला तिच्या
हरघडी लढाया तयार दाखवू जगाला तिचा आरसा ॥३॥
इंदिराजी कशा राज्यकर्त्या जहाल्या
सावित्रिबाइ ज्ञानज्योती उजळून गेल्या
किरण बेदिने दुष्टांना बेड्या ठोकल्या
अन सकपाळ निराधारांचा आधार झाल्या
इतक्या भरिव कार्याचा हा खजिना विसरावा कसा ॥४॥
कितितरी अशा अनेक किर्तिवंत गाथा
जिथे नतमस्तक होवोनी झुकतो माथा
नावे किती आणि कुणाकुणाची घ्यावी
शब्दही थकतिल तयांची किर्ती गाता
इतिहास झाला चला घडवू या मिळूनी वर्तमानही तसा ॥५ ॥
आम्ही चालवू हा पुढे वारसा
तेजोमय पावन स्त्री शक्तिचा वसा ॥ध्रु॥