नको तिथे

आयुष्य माझे फाटले आहे नको तिथे
अन ह्या बघ्यांनी गाठले आहे नको तिथे

नशिबात काट्यांच्या अता उघडयावरी जिणे
कां घर फुलांनी थाटले आहे नको तिथे?

गावात ह्या होत्या हजारो घागरी रित्या
ते आंधळे जल बरसले आहे नको तिथे

उल्लेख माझाही असे गोष्टीमध्ये तिच्या
पण नाव माझे आणले आहे नको तिथे

स्वर्गाविना नाही म्हणे जागा मला कुठे
कां पुण्य इतके साठले आहे नको तिथे?

बदनाम ह्या वस्तीमध्ये हा चेहरा कसा?
कां रूप 'त्याने' वाटले आहे नको तिथे?