शीण थोडा घालवू या

पेलले ओझे, जिवाचा
शीण थोडा घालवू या
ये सखे पाने स्मृतींची
सांजवेळी चाळवू या

जे घडावे ते न घडले
प्राक्तनाचा खेळ सारा
भोगला होता किती तो
भावनांचा कोंडमारा
जिंकली आहे लढाई
चल तुतारी वाजवू या
ये सखे पाने स्मृतींची
सांजवेळी चाळवू या

चैन म्हणजे काय असते
हे कुठे माहीत होते
पोट भरण्या घाम आणी
कष्ट हे साहित्त्य होते
भोगले अन्याय जे जे
चल जगाला ऐकवू या
ये सखे पाने स्मृतींची
सांजवेळी चाळवू या

वेदना भोगीत चेहरा
नाटकी हसराच होता
मुखवट्याच्या आत दडला
तो कुणी दुसराच होता
लक्तरे शोकांतिकेची
चावडीवर वाळवू या
ये सखे पाने स्मृतींची
सांजवेळी चाळवू या

दोन असतिल फक्त नोंदी
जन्मलो मेलो कधी त्या
आत्मवृत्तातील पाने
का अशी कोरी विधात्या?
मोकळ्या पृष्ठांवरी चल
दु:ख थोडे गोंदवू या
ये सखे पाने स्मृतींची
सांजवेळी चाळवू या

हे कवडशा! सांगतो मी
तू घरी येवू नको रे
मस्त काळॉखात जगतो
तू दया दावू नको रे
तेवला नाही कधी जो
दीप तोही मालवू या
ये सखे पाने स्मृतींची
सांजवेळी चाळवू या

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com