थेंब वेडे पावसाचे....

थेंब वेडे पावसाचे....

जलदाच्या पालखीत
दिमाखात मिरवले
थेंब वेडे पावसाचे
मातीमधे मिसळले ?

असे कसे हे घडले
पायउतार का झाले ?
ओढ मायधरतीची
अंकावर आरुढले

मातीमधे मिसळता
मातीमोल नाही झाले
नाना रुपांनी सजूनी
अनमोल किती झाले

थेंब मातीशी मिळता
कसे नवल वर्तले
साज हिरवा लेउन
तरारुन वर आले

पावसाचे थेंब काही
कसे मातीत रुजले
जाईतून उमलून
शुभ्र, गंधमय झाले

थेंब मोती थेंब दाणे
चैतन्याने मूर्त होणे
मनातही उतरती
शब्द थेंबांचेच देणे.....