एकटा असतो कधी मी का जगाला वाटते?
वेदना मैत्रीण माझी मज कधी ना सोडते
व्यक्त करण्या भाव माझे मैत्रिणी सरसावती
आसवांची धार माझे दु:ख सारे सांगते
भोवती गर्दी तरीही सौंगडी नाही कुंणी
पण बिचारे एकलेपण नेहमी मज शोधते
मस्त नाते जोडले मी आज आहे मजसवे
गैरसमजाची हवा येथे कधी ना वाहते
एकटेपण अवयवांनाही नकोसे जाहले
पापण्यांना आसवाची साथसंगत लागते
एकलेपण जन्म देते कल्पनांना नवनव्या
काव्य, गजला, शेर लिहिण्या लेखणी सरसावते
मी जरी धनवान नाही गच्च भरलेला खिसा
एकलेपण ठेवलेले शीळ घाल चालते
श्वास अन् निश्वास दोन्ही संगतीने राहती
एक गेला एक उरला शक्य हे का वाटते?
हे खरे "निशिकांत" जगला एकटे नाही कधी
आत बघता ईश्वराचे रूप नयनी दाटते
निशिकांत देशपांडॅ मो/क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com